टाकळीतील पर्यटनस्थळांच्या सुशोभीकरणाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नाशिक - आगरटाकळी येथे समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या ठिकाणी महापालिकेने खास समाजमंदिर बांधले पण तपाहून अधिक काळ लोटल्यानंतरही उपयोगाविनाच ते पडून आहे. महापालिकेकडून वापर नाही, देवस्थानाकडून देखभाल नाही. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनस्थळांच्या यादीत ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या टाकळीत नाशिक दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांसमोर टाकळीच नव्हे, तर सगळ्या नाशिक शहराचे प्रदर्शन सुरू आहे.

नाशिक - आगरटाकळी येथे समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या ठिकाणी महापालिकेने खास समाजमंदिर बांधले पण तपाहून अधिक काळ लोटल्यानंतरही उपयोगाविनाच ते पडून आहे. महापालिकेकडून वापर नाही, देवस्थानाकडून देखभाल नाही. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनस्थळांच्या यादीत ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या टाकळीत नाशिक दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांसमोर टाकळीच नव्हे, तर सगळ्या नाशिक शहराचे प्रदर्शन सुरू आहे.

टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी गोमय हनुमानाची प्रतिष्ठापना करून १२ वर्षे तपश्‍चर्या केली. त्यामुळे समर्थ भक्तांच्या दृष्टीने टाकळीचे महत्त्व मोठे आहे. हनुमान भक्त समर्थांचे अभ्यासक व भाविक नाशिक दर्शनादरम्यान टाकळीला येतात. राज्य महामंडळाने नाशिक दर्शन बसच्या दौऱ्यात टाकळीचा समावेश केला होता. त्यामुळे टाकळीला येणाऱ्यांची राज्यभरातील भाविकांची संख्या मोठी आहे. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, ज्या टाकळीला भाविक येतात, तेथे त्यांना टाकळीला सुशोभीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने मात्र दुरवस्थेचे दर्शन घडते.

लाखोंच्या खर्चाचा अट्टाहास का?
समर्थ रामदास स्वामी मारुती मंदिर देवस्थानाजवळ घाट उभारणी आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गत हे काम करण्यात आले. माजी आमदार वसंतराव गिते महापौर असताना त्यांच्या कारकीर्दीत कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर महापालिकेने २००२ पर्यंत भव्यदिव्य स्वरूपाच्या दोन मोठ्या सभागृहांच्या इमारती बांधल्या. सुशोभीकरण सजावटींतर्गत नासर्डीलगत इमारत उभारली. पण प्रकल्पाचे आतापर्यंत कधी उद्‌घाटनच झाले नाही. तब्बल बारा वर्षांपासून कुठला वापरच झाला नाही. त्यामुळे मग लाखो रुपयांचा खर्च केला तरी कशासाठी, हा प्रश्‍न कायम आहे. 

न वापराचे एक तप
उद्‌घाटनानंतर संबंधित इमारतीचे काय करायचे याचा कुठलाही निर्णय झाला नाही. महापालिकेने स्वतःही तेथे कुठले कामकाज सुरू केले नाही आणि देवस्थानाच्या विश्‍वस्त मंडळाकडे इमारत देखभालीसाठी दिली नाही. त्यामुळे उद्‌घाटनानंतर तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ महापालिकेची कोट्यवधी रुपये खर्चाची दोन सभागृहांची वास्तू धूळखात पडून आहे. सभागृहांना फळ्या व पत्रे ठोकून सभागृह बंद ठेवले आहे.

टवाळखोरांचे रंगतात पत्त्यांचे डाव
नदीलगतच्या इमारतीचा वर्षानुवर्षांपासून वापरच होत नसल्याने टवाळखोरांकडून नदीलगतच्या भागात पत्त्यांचे डाव चालतात. पत्ते खेळण्याशिवाय कुठलाही वापर होत नाही. त्यामुळे दूरवरून रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या आगरटाकळी येथील मठ व त्यातील गोमय हनुमानाची मूर्ती पाहायला येणाऱ्या पर्यटकांना दुरवस्थाच दिसते. वास्तू महापालिकेची आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अर्थातच महापालिकेची आहे मात्र तेथे सततचा वावर देवस्थानाचा आहे.

देवस्थानातर्फेही महापालिकेच्या वास्तूंची देखभाल ठेवता येणे शक्‍य आहे. पण दोन्हीमध्ये कुठलाही संवाद नसल्याने महापालिकेने पत्र्याचे दरवाजे लावून इमारतीकडे पाठ फिरविली आहे. संबंधित वास्तू महापालिकेची असल्याने विश्‍वस्त संस्था फिरकत नाही. त्यामुळे दोन्ही यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे टाकळी परिसर विकास कमी आणि उदासीनता जास्त असेच सध्या या भागातील चित्र आहे.

दासबोध या परिपूर्ण ग्रंथाबरोबरच मनाचे श्‍लोक, गणपती आरतीची निर्मिती आणि गोमय मारुतीची रामदास स्वामींनी स्थापना केली. टाकळी ही त्यांची तपोभूमी आहे. टाकळीचा सज्जनगडाच्या धर्तीवर विकास व्हावा.

मठाधिपतींनी येथील जमिनीसह अन्य बाबींवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरुद्ध ४२ वर्षे समर्थ सेवा मंडळाने कायदेशीर लढा दिला. या अनोख्या स्थळाची विद्यार्थी, पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, राज्य शासनाकडे पर्यटन विकासासाठी आम्ही १६ कोटींची मागणी केली. त्यांपैकी बाह्य विकास व सुशोभीकरणासाठी तीन कोटींचा निधी मिळाला आहे. टाकळी हे नाशिकचे भूषण आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. 
- ज्योतिराव खैरनार, विश्‍वस्त, टाकळी