अंध-अपंगांच्या सवलतीसाठी महापालिकेचा कृती आराखडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाशिक - कायद्याप्रमाणे अंध, अपंगांना तीन टक्के सवलत देण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. महासभेवर सुमारे चौदा कोटींचा कृती आराखडा ठेवला जाणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र उद्यानापासून ते आयटीआयपर्यंतचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के निधी दिव्यांगांचा विकास व योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. महापालिकेतर्फे पुरेशा प्रमाणात निधी खर्च होत नव्हता. गेल्या महिन्यात याच विषयावरून प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर महापालिकेने तत्काल पूर्ण निधी खर्च करण्याचे आश्‍वासन दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आज अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या दालनात बैठक झाली. 

प्रशासन उपायुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता यू. बी. पवार, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी व वीज विभागाचे कार्यकारी अभियंता वनमाळी उपस्थित होते. अंध व अपंग कल्याण योजनेंतर्गत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिव्यांग मुलांना व्यायामशाळा व त्यात त्यांना सहज उचलता येईल, असे साहित्य ठेवणे, व्यायामशाळेत दुखापत होणार नाही असे कार्पेट बसविणे आदी कामे केली जाणार आहेत. महासभेच्या मान्यतेनंतर योजनांची अंमलबजावणी होणार आहे.

दिव्यांगांसाठी कृती आराखडा
शहरातील शाळांमध्ये २४ संशोधन केंद्रे निर्माण करणे
व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे
हैदराबाद शहराच्या धर्तीवर उद्यान
सहा विभागांत व्यायामशाळा
स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था