नव्या विकास आराखड्यात नासर्डीच्या संरेखनात बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सातपूरमधील बदलाने संशय; नकाशे दुरुस्तीचा प्रस्ताव

नाशिक - नव्या शहर विकास आराखड्यातील नकाशांना शुक्रवारी अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्यात नासर्डी नदीच्या किनारी आखलेल्या निळ्या व लाल रेषेतील संरेखनात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. विशेषतः सातपूरमध्ये हे बदल झाले असून, याबाबत संशय निर्माण झाल्याने स्थानिक पातळीवर महापालिका प्रशासनदेखील हबकले आहे. भविष्यात कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून पुन्हा शासनाकडे आराखडे दुरुस्तीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेब्रुवारीत महापालिकेचा शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्या वेळी नकाशे जाहीर करण्यात आले. त्या नकाशांवर हरकती व सूचनेसाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मुदतीत हरकती, सूचना मागविल्यानंतर शासनाकडे आराखडे, नकाशे मंजुरीसाठी पाठविले. शुक्रवारी अंतिम नकाशे महापालिकेला प्राप्त झाले. त्यात नासर्डी व गोदावरी नदीच्या बाजूला आखलेल्या लाल व निळ्या पूररेषेतील संरेखनात बदल झाल्याचे दिसून आले. नासर्डी भागामध्ये सातपूर विभागात हे बदल झाले आहेत. राज्य शासनाने नुकतेच अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची नियमावली जाहीर केली. त्यातसुद्धा निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना अधिकृत करता येत नसल्याचे नमूद करण्यात आले. असे असताना शहराच्या अंतिम नकाशांना मंजुरी देताना नासर्डीवरील लाल व निळी पूररेषा कशी बदलली, याबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने शासनाकडे दुरुस्तीसाठी नकाशे पाठविणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले.

बदलामागे बिल्डर लॉबी ? 
२००८ मध्ये गोदावरी व नासर्डीला मोठा पूर आला होता. त्या वेळी शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत पाणी आल्याने पाटबंधारे विभागाने निळी व लाल पूररेषा निश्‍चित केली होती. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या डाव्या व उजव्या तीरावरील हजारो बांधकामांना पूर्णत्वाचे दाखले मिळू शकले नाही. ती संख्या अडीच हजारांपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते. चालू इमारतींना पूर्णत्वाचे दाखले तर नाहीच, शिवाय मोकळ्या भूखंडावरदेखील इमारत बांधता येत नसल्याने अनेकांकडून पूररेषा रद्द करण्याची मागणी होत होती.

महापालिकेनेसुद्धा पाटबंधारे विभागाने आखलेली पूररेषा अमान्य करत नव्याने रेषा आखण्याची मागणी केली होती. त्यामुळे नव्याने मंजूर नकाशांमध्ये नासर्डीकिनारी असलेली रेषा बदललीच कशी, असा सवाल उपस्थित होत असून, त्यामागे नदीकिनारी जमिनी असलेल्या बिल्डर लॉबीचा हात असल्याचे बोलले जात आहे.