अटकपूर्व जामीन फेटाळल्याने नगरसेवक गजानन शेलार फरारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जुने नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक गजानन शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी त्वरित त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेलार हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले.

पोलिसांना झुकारून गजानन शेलार व त्यांच्या दंडे हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केले होते. 

आज न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, चिथावणी देत डीजे लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन, तसेच त्यांच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल असल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केली. परिणामी न्यायालयाने शेलारांचा जामीन फेटाळला. अर्ज फेटाळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, श्री. देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सीताराम कोल्हे यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाचे पथक यांचा फौजफाटा त्यांच्या निवासस्थानी दाखल झाला. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. शेलार आढळले नाहीत. पोलिस उपायुक्त पाटील यांनी परिसरातील नागरिकांना शेलार यांची माहिती देण्याचे आवाहन करत, माहिती सांगणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या घरीही शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी जुने नाशिक परिसरातून संचलनही केले. अटकेपासून वाचण्यासाठी शेलार जामीन मिळविण्यासाठी मुंबईत गेल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  

भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यांत त्यांच्यासह डीजेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यात मंडळाचे पदाधिकारी व डीजेचालक यांना पूर्वीच पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटकाही केली. शेलार यांनी मात्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांना सुनावणीपर्यंत तात्पुरता जामीन दिला होता.

Web Title: nashik news corporator gajanan shelar fugitive