सिगारेटचे कंटेनर लुटून शाहरूख-चन्याकडून कोटीत विक्री 

सिगारेटचे कंटेनर लुटून शाहरूख-चन्याकडून कोटीत विक्री 

नाशिक - चोरलेल्या सिगारेट विक्रीच्या माध्यमातून श्रीरामपूरच्या तीन गुन्हेगारांचे परराज्यात कनेक्‍शन असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. नाशिकमध्ये काल (रविवारी) पकडलेल्या या गुन्हेगारांनी अनेक गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यांनी गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यात एक खून केल्याचेही स्पष्ट झाले आहे. चोरलेल्या सिगारेट विक्रीच्या दीड कोटीच्या रक्कमवाटपावरून शाहरूख रज्जाक शेख व चन्या बेग यांच्यात सहा महिन्यांपूर्वी वितुष्ट आले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी  नगरमध्ये दिली. 

श्रीरामपूरसह अनेक भागांत मोठी दहशत असलेल्या चन्या बेग टोळीतील गुंड, शार्पशूटर शाहरूख रज्जाक शेख (वय 25, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर), सागर सोना पगारे (22) व बारकू सुदाम अंभोरे (21, दोघे रा. चितळी, ता. राहाता) यांना नाशिक पोलिसांच्या मदतीने नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने नाशिक येथे पकडले. त्यांच्याकडून उकल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत शर्मा यांनी पत्रकारांना   माहिती दिली. 

शर्मा म्हणाले, की पकडलेल्या आरोपींपैकी शाहरूख शेख "मोक्का'मधील आरोपी असून, तो कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात असताना न्यायालयातून पळून गेला होता. या आरोपींनी गळ्यातील चेन पळविण्यापासून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे केले आहेत. येथे गुन्हा केल्यानंतर ते परराज्यात पळून जात. पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत काही काळ ते राहिले. कोपरगाव न्यायालयातून पळून गेल्यानंतर शाहरूखसह अन्य आरोपी नाशिकमध्ये राहत होते. त्यांनी आतापर्यंत चार वेळा राहण्याची ठिकाणे बदलली. 

शाहरूखने गंगापूर तालुक्‍यात एका मित्राचा खून केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय अन्य काही गुन्हे उघड होत आहेत. त्यांनी आतापर्यंत नारायणगाव, नवी मुंबई, लोणावळा येथे सिगारेट असलेले कंटेनर लुटले आहेत. कारागृहात असताना एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. त्याच्या माध्यमातून लुटलेले सिगारेट ते परराज्यात विकत होते, असे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले. 

चन्याला मारण्यासाठीच आणली गावठी पिस्तुले 
शाहरूख चन्या ऊर्फ सागर बेगचा साथीदार आहे. दहा दिवसांपूर्वी अरणगाव (ता. नगर) येथे चन्याला पकडल्यावर पळालेल्यांमध्ये शाहरूखसह अन्य लोक होते. त्यांनी सात महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील खांदेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटचा ट्रक लुटला. सव्वाचार कोटी रुपये किंमत असलेले सिगारेट सव्वा कोटीला विकले. त्यातील 75 लाख रुपये स्वतःकडे ठेवून बाकी रक्कम चन्याने वाटप केली. शाहरूख चन्याकडे आणखी पैशांची मागणी करत होता; मात्र पैसे मिळत नसल्याने चन्या व शाहरूखमध्ये अलीकडच्या काळात वितुष्ट आले. त्यामुळे ते एकमेकांना संपविण्याची तयारी करत होते. नाशिकमध्ये काल (रविवारी) पकडल्यावर त्यांच्याकडे सापडलेली गावठी पिस्तुले, कट्टे चन्या बेगला मारण्यासाठीच आणल्याचे स्पष्ट झाले. ही पिस्तुले प्रत्येकी सत्तर हजार रुपयांना बिहारमधून आणली असून, महाराष्ट्रात त्याची किंमत प्रत्येकी सुमारे दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com