सिन्नर येथील कुंटणखान्याच्या नानीसह तिघांना अटक

सिन्नर येथील कुंटणखान्याच्या नानीसह तिघांना अटक

नाशिक - बांगलादेशी युवतीवर सिन्नरच्या कुंटणखान्यात अत्याचार करण्यात येऊन तिची मुंबईला विक्री करणाऱ्या कुख्यात कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे हिच्यासह तिचा मुलगा विशाल गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. 

सिन्नर एमआयडीसी पोलिसांना अंधारात ठेवून बलात्कारासह ‘पिटा’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र, अजूनही पोलिस सिन्नर एमआयडीसीच्या पोलिसांना वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याचे कारवाईतून समोर येत आहे. यामागे कुणाचा वरदहस्त आहे, याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, तिन्ही संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वर्षभरापूर्वी पीडित बांगलादेशी युवतीला तिच्याच 

मावशीने भारतात फिरण्याच्या बहाण्याने आणत थेट सिन्नरच्या कुंटणखान्यात तिची विक्री केली. या प्रकरणी पीडित युवतीने प्रसारमाध्यमांकडे आपल्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा मांडली. त्यानंतर ग्रामीण पोलिस खडबडून जागे झाले. पोलिसांनी पीडित युवतीसह तिला वेश्‍याव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित युवतीच्या जाबजबाबानुसार बुधवारी मध्यरात्री सिन्नरच्या कुंटणखान्यातून पीडित युवतीवर बलात्कार करणारे संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे, दलाल सोनू नरहरी देशमुख यांना अटक केली, तर आज पहाटे कुंटणखान्याची मालकीण नानी ऊर्फ मंगल नंदकिशार गंगावणेला अटक केली. सिन्नर पोलिसांत पीडित युवतीच्या तक्रारीनुसार विशाल गंगावणे, नानी गंगावणे व सोनू देशमुख यांच्यासह तिची मावशी माजिदा अब्दुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्याकडे तपास देण्यात आल्याचे अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले. 

सिन्नर पोलिसांवर कारवाई कधी?
पीडित युवतीने प्रसारमाध्यमांकडे बोलताना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. पीडित युवकानेही गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये याच अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच या पीडितेची नंतर मुंबईत विक्री होऊन तिला गेली काही महिने शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. त्याच वेळी सिन्नर पोलिसांनी कारवाई केली असती तर पीडितेला जीवघेण्या अत्याचाराला सामोरे जावे लागले नसते. संबंधित पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. अजूनही पोलिसांकडून संबंधित दोषी सिन्नर पोलिसांचीच पाठराखण करत असल्याचे समोर आले आहे. 

पीडितेची सुधारगृहात रवानगी, शोधासाठी पथके
पीडित बांगलादेशी युवतीची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अधीक्षक संजय दराडे यांनी पीडित युवतीचे बनविण्यात आलेले निवडणूक ओळखपत्र, तिला भारतात आणणारी तिची मावशी संशयित माजिदा अब्दुल आणि बांगलादेशातून भारतात आणि नाशिकपर्यंत असलेल्या रॅकेटचा शोध घेण्यासाठी चार-पाच पथके तयार केल्याचे सांगितले. 

पीडित बांगलादेशी युवतीच्या जाबजबाबानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली आहे. अजूनही काहींना अटक करायची आहे. पोलिस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल. तो कुंटणखाना बंदच आहे. त्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील केले जाईल. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील. त्या दृष्टिकोनातूनच तपास होईल. 
- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

राजकीय हस्तक्षेपाची शक्‍यता
सिन्नर-मुसळगावचा कुख्यात कुंटणखाना जिल्ह्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. राजकीय नेत्यांच्या कृपाशीर्वादामुळेच आजतागायत या कुंटणखान्यावर ठोस कारवाई झाली नाही. ‘नानी’चे नाशिकसह सर्वदूर रॅकेट कार्यरत असल्याने आज जरी कुंटणखान्यावर ‘धंदा’ सुरू नाही, पण अन्य ठिकाणी याच राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे नानीचा ‘असा प्रकार’ सुरूच आहे. यापूर्वीही नानीवर दोन वेळा ‘पिटा’अंतर्गत कारवाई झाली. पण कुंटणखाना बंद झाला नाही. यामागे राजकीय वरदहस्त अन्‌ स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात कुणाचा वरदहस्त आहे, हे शोधणे आवश्‍यक आहे. 

बांगलादेशी पीडित युवतीचे प्रकरण अधिवेशनात - आमदार जयवंत जाधव
नाशिक - बांगलादेशी पीडित युवतीवर मुसळगाव (ता. सिन्नर) येथील कुंटणखान्यात झालेला अत्याचार आणि मुंबईतील विक्री प्रकरणाची चौकशी करावी, तसेच कुंटणखान्याला संरक्षण देणारे पोलिस अधिकारी व कुंटणखाना चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. 

विधान परिषदेच्या सभागृहात मांडलेल्या उल्लेखाच्या सूचनेत त्यांनी म्हटले, की मानवी तस्करीच्या माध्यमातून बांगलादेशातून फसवून आणून सिन्नरजवळील मुसळगावच्या कुंटणखान्यात अत्याचाराला सामोरे गेलेल्या बांगलादेशी युवतीने धाडसाने सुटका करून घेतली व प्रसारमाध्यमांसमोर आपबिती सांगितली. यामुळे पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीडित युवती संकटात असताना, सिन्नर पोलिसांनी संबंधित मुलीला सुखरूप बांगलादेशात सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला. प्रत्यक्षात त्या युवतीची आणखी होरपळ होऊन तिला पुन्हा वेश्‍याव्यवसायात ढकलण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. हा प्रकार धक्कादायक असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना आमदार जाधव यांनी आज केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com