वृद्धापकाळातील आजारांवर हवेत प्रभावी उपचार - डॉ. वट्टमवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नाशिक - सामान्यांपेक्षा वयोवृद्ध रुग्णांमधील विविध आजारांतील स्थिती वेगळी असते. त्यांना उद्‌भवणाऱ्या समस्याही पूर्णपणे वेगळ्या असतात. व्यवस्थित निदान करून त्यांच्यावर प्रभावी उपचार करावेत, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी आज येथे केले. 

येथे हॉटेल एमरार्ल्ड पार्कमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे ज्येष्ठांच्या समस्यांवरील आयोजित जेरिकॉन २०१७ परिषदेत ते बोलत होते. आज दुसऱ्या दिवशी विविध सत्रांतून तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मार्गदर्शन लाभले. यात डॉ. वट्टमवार यांनी मेंदुविकारासंदर्भात मार्गदर्शन केले. वृद्धांची पडण्याची भीती लक्षात घेता घरातील इंटिरिअर कसे असावे या संदर्भात डॉ. संजय बजाज यांनी मार्गदर्शन केले. जीवन जगण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यावे याबाबत डॉ. गोपीचंद शेणॉय यांनी मार्गदर्शन केले. साठीनंतर सुदृढ संभोग या विषयावर डॉ. दीपक जुमानी यांनी मार्गदर्शन केले. विविध तज्ज्ञांनी त्यांच्या शाखेविषयी माहिती दिली.

परिषदेत सुमारे बाराशे डॉक्‍टरांनी सहभाग नोंदविला होता. आतापर्यंतची ही सर्वाधिक उपस्थिती असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

दरम्यान, परिषदेचे संयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव डॉ. हेमंत सोननीस यांच्यासह नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. विशाल पवार, डॉ. राजश्री पाटील, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. कविता गाडेकर, डॉ. किरण शिंदे, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. किशोर भंडारी, डॉ. सुषमा दुगड, प्रज्ञा पाटील यांनी परिश्रम घेतले.