मंडप व्यवसायामुळे हजारो हातांना रोजगार

मंडप व्यवसायामुळे हजारो हातांना रोजगार

गरजेनुसार हजार रुपयांपासून ते लाखोंचे मंडप उपलब्ध

नाशिक - चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्याच्या आगमनाने मन हर्षभरीत व उल्हासित होते, अशा गणरायाचे आगमन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शहर परिसरात मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे. गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर शहरातील मंडप व्यापसायिकांना सुगीचे दिवस असून, त्याद्वारे मंडप उभारणीचे काम करणाऱ्या हजारो हातांना रोजगार उपलब्ध होत आहे. शहरातील लहान-मोठ्या मंडप व्यावसायिकांकडे हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे सेट उपलब्ध आहेत.

लाडक्‍या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे शहर परिसरासह उपनगरांत मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आहे. यंदा प्रथमच महापालिकेने मंडपाच्या आकाराबाबत खंबीर भूमिका घेतल्याने एरवी भव्य मंडप टाकणाऱ्या मोठ्या मंडळांची काही प्रमाणात पंचाईत झाली आहे. मात्र, असे असलेतरी या व्यवसायाद्वारे कोट्यवधींची उलाढाल होणार असून, पुढील काही दिवस कष्टकऱ्यांच्या हातांना कामही उपलब्ध होणार आहे. शहर परिसरात लहान- मोठे दोनशे मंडप व्यावसायिक कार्यरत आहेत. त्यात डिंगोरे डेकोरेटर्स, रमेश आर्टस, शर्मा मंडप डेकोरेटर्स, सप्तशृंग मंडप असे विविध व्यावसायिक आघाडीवर आहेत. या व्यावसायिकांकडे अगदी लग्न, मुंजपासून ते थेट कॉर्पोरेट इव्हेंटपर्यंतच्या कार्यक्रमांसाठी भव्य व आकर्षक मंडप उपलब्ध करून देण्यात येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंडपवाल्यांकडे साउंड सिस्टिम, फुलवाले, लाइट आदी सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत नाही. सर्वसाधारणपणे फायबर, कपडा व पॅनल अशा तीन पद्धतीने मंडपाचे काम केले जाते. यातील फायबरच्या मंडपासाठी इतर दोन प्रकारांपेक्षा अधिक खर्च येतो. सध्या या व्यवसायाला चांगले दिवस असले तरी कामगार सांभाळणे अवघड असल्याचे सर्वच व्यावसायिकांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत आजच्या कामगारांच्या गरजा वाढत आहेत. त्यामुळे त्यांची मने सांभाळत काम करणे अवघड बनल्याचे अनेकांचे मत आहे. अनेक व्यावसायिकांकडे भव्य राजवाडे, महाल असे फायबरचे पॅलेसही उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लाखो रुपये खर्चाची तयारीही हवी. 

मंडपाच्या आकाराबाबत यंदा प्रशासन दक्ष
गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळे त्यांच्या आर्थिक व इतर कुवतीनुसार मंडपाची उभारणी करत असतात. त्यामुळे नाशिककरांना मागील वर्षांपर्यंत भव्य मंडपांची सवय झाली होती. मात्र, या वर्षी प्रशासनाने प्रथमच कडक धोरण अबलंबले आहे. त्यानुसार रस्त्याच्या केवळ २५ भागावरच मंडपाची उभारणी करता येणार आहे. मात्र, यामुळे अनेक मंडळांचे भव्य मंडपाचे स्वप्न भंगले आहे. प्रशासनाने काही ठिकाणी खंबीर भूमिका घेत विनापरवानगी उभारलेले भव्य मंडप काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष तोटा मंडप व्यावसायिकांनाही होत आहे.

मंडप व्यवसायात पूर्वीच्या तुलनेत आज स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे सेट्‌स उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी अवघ्या पंधराशे रुपयांपासून ते लाखो रुपयांचे पॅकेजही उपलब्ध आहे.
- भूषण पवार, मंडप व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com