पिंपळगाव खांब ‘एसपीटी’च्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

पिंपळगाव खांब ‘एसपीटी’च्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

नाशिक/नाशिक रोड - पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रासाठी भूसंपादन करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. काही अटींची पूर्तता न झाल्याचे, तसेच उच्च न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिल्याचे सांगत काही शेतकऱ्यांनी भूसंपादन करण्यास विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भूसंपादनाची कारवाई केली.

पिंपळगाव खांब येथे शासनाने अमृत योजनेतून मलनिस्सारण केंद्र मंजूर केले आहे. त्यासाठी साडेसहा हेक्‍टर जागा संपादित करण्यासाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रयत्न आहेत. परंतु शेतकऱ्यांचा जागा देण्यास सुरवातीपासून विरोध आहे. २२ नोव्हेंबरला जागा संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यानुसार सुमारे अडीचशे पोलिस व दंगा नियंत्रण पथकासह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेचे अधिकारी सकाळी साडेदहाला पोचले. जेसीबी, डंपर प्रत्यक्ष जागेवर पोचल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने कारवाई करू नये, अशी विनंती करण्यात आली. परंतु अधिकाऱ्यांनी सर्वे क्रमांक दोनमधील काही शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्यास सुरवात केली. 

सर्वे क्रमांक ६३ मधील भूसंपादन प्रक्रियेला सुरवात केली असतानाच दुपारी पावणेबाराला उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कारवाईस स्थगिती दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परंतु न्यायालयीन आदेशाची प्रत प्राप्त होत नाही तोपर्यंत कारवाई थांबविणार नसल्याची भूमिका घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर भूसंपादनाची कारवाई थांबविण्यात आली. उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, कार्यकारी अभियंता संजय घुगे, नगररचनाचे उपअभियंता प्रशांत पगार, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन उपस्थित होते.

गोंधळ अन्‌ भूसंपादन
सर्वे क्रमांक दोनमधील प्रेमा बोराडे, महादू बोराडे, भिका बोराडे, लिलाबाई बोराडे, राजेंद्र बोराडे यांनी आपली जमीन प्रकल्पासाठी देण्याचे मान्य करून संमतीपत्रही दिले. त्यांच्या खात्यावर एकूण पाच कोटी ६३ लाख रुपये जमा झाले. दरम्यान काही अटींची पूर्तता न झाल्याने प्रेमा बोराडे व त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध करत काम बंद पाडले. पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न झाला; परंतु बोराडे कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आत्महत्येच्या धमकीनंतर पोलिसांनी प्रेमा बोराडे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी जागेचा ताबा घेऊन सीमारेषेवर खांब रोवले. जागा ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सर्वे क्रमांक ६३ मधील भूसंपादन कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिल्याने ती जागा संपादित केली नसल्याचे उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी माहिती दिली. सोमनाथ बोराडे, दीपक बोराडे, भिवाजी बोराडे, हेमंत बोराडे, विश्‍वास बोराडे आदी शेतकऱ्यांनी बळजबरीने भूसंपादन केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com