मूर्ती विसर्जनानंतर विहिरी बुजविल्याच कशा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नाशिक - प्रदूषण कमी करण्यासाठी राबविलेल्या गणेशमूर्तिदानाच्या उपक्रमातून प्राप्त झालेल्या एक लाख ६९ गणेशमूर्तींचे शहरातील सहा विभागांमधील विहिरींत विसर्जन केल्याचा दावा महापालिकेने केला आहे; परंतु मूर्ती विसर्जनानंतर त्या विहिरी बुजविण्यात आल्याच्या स्पष्टीकरणाने प्रशासनासमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. नैसर्गिक स्रोत बुजविता येत नाही. त्यामुळे पालिकेने विहिरी बंद केल्याच कशा?, या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या गणेश विसर्जनावेळी महापालिकेतर्फे विभागनिहाय मूर्तिदानाचा उपक्रम राबविला होता. त्यासाठी शहरात २९ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. विसर्जन स्थळांवर मूर्तीसंकलन केंद्रेही बनविण्यात आली होती. या वर्षी एक लाख ६९ हजार मूर्ती प्राप्त झाल्या. दर वर्षी महापालिकेकडून मूर्तींची विल्हेवाट लावली जाते; परंतु यंदा विसर्जनाच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला व त्यात मूर्तींची विटंबना दिसून येत होती. व्हायरल व्हिडिओ व महापालिकेचा संबंध नसल्याचा खुलासा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला होता. काही पर्यावरणप्रेमींनी या वर्षी संकलित केलेल्या मूर्ती कुठे विसर्जित केल्या याबाबत महापालिकेकडे विचारणा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर संकलित मूर्ती सहा विभागांतील काही पडक्‍या विहिरींमध्ये विसर्जित करण्यात आल्याचे महापालिकेकडून आज स्पष्ट करण्यात आले. त्यात पश्‍चिम विभागात उंटवाडी व भगूरकर मळा, सातपूर विभागात संकलित केलेल्या मूर्ती अंबड लिंक रोड, कोरडेनगर, खांदवेनगर, सिडकोत संकलित केलेल्या मूर्ती दोंदे मळा, पाथर्डी, फडोळ मळा, डीजीपीनगर, पंचवटीतील अनुसयानगर पेठ रोड, नाशिक रोड विभागातील मूर्ती गोसावीनगर, बालाजीनगर, सायखेडा रोड, पाथर्डी येथील दोंदे मळा, तर पूर्व विभागातील मूर्ती सेंट थॉमस बेथानी स्कूलजवळील विहिरीत विसर्जित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मूर्ती विसर्जनानंतर त्या पडक्‍या विहिरी बुजविण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु नैसर्गिक स्रोत बुजविता येत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ज्या विहिरींमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या त्या वापरात नसलेल्या होत्या, असे स्पष्टीकरण शहर अभियंता यू. बी. पवार यांनी दिले.

Web Title: nashik news ganpati murti visarjan isue