गोदापात्रातून बेकायदा वाळूउपसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

जुने नाशिक - गोदावरी नदीपात्रातून काही जण सर्रास बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करीत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून, ठिकठिकाणी असे प्रकार होत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.

जुने नाशिक - गोदावरी नदीपात्रातून काही जण सर्रास बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करीत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून, ठिकठिकाणी असे प्रकार होत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.

शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीस दोन वेळा पूर आला. सध्याही धरणातून सोडलेल्या पाण्यासह पावसाळी नदी-नाल्यांचे पाणी गोदावरीत मिसळत आहे. त्यामुळे आजही नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी-नाल्यांतून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आली आहे. ही वाळू वेगवेगळ्या पात्रांतून बेकायदेशीररीत्या उपसा केली जात आहे. गौरी पटांगण येथील नदीपात्रातून वाळूउपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो ब्रास वाळूचा बेकायदा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, उपसा केलेली वाळू त्याच ठिकाणी विक्री केली जात आहे. तरी पोलिस, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांकडूनही याकडे डोळेझाक होत असल्याने खुलेआम मालमत्तेची चोरी होत आहे. अशा वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गोदावरी बचावसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी केली आहे. 

वाळू उपशाची ठिकाणे
शासनाच्या नाकावर टिच्चून बेकायदा वाळूउपसा होत असलेली ठिकाणे याप्रमाणे ः वडाळा रोड येथील नासर्डी नदीपात्र, गौरी पटांगण, आनंदवली परिसर, सोमेश्‍वर.