भांडणाच्या बदल्यासाठी लुटले दहा किलो सोने 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक - मालकाच्या मुलांनी घातलेल्या वादाचा मनात द्वेष, तर दुसऱ्याला कोट्यधीश बनण्याचे लागलेले वेध या बदल्याच्या आगीतून सिनेस्टाइल चोरीचा कट रचला गेला. सेल्समनने अल्पवयीन (विधी संघर्षित बालक) नोकरासह काम करत असलेल्या सराफी पेढीतील दहा किलो सोनेलुटीचा मास्टर प्लॅन तयार केला. पण पोलिस अधीक्षक संजय दराडे व त्यांच्या ग्रामीण पोलिसांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 24 तासांत दोन कोटींचा ऐवज हस्तगत करत दसऱ्यापूर्वीच दरोड्याच्या खऱ्या सोनेलुटीचे प्रकरण निकाली काढले. 

नाशिक - मालकाच्या मुलांनी घातलेल्या वादाचा मनात द्वेष, तर दुसऱ्याला कोट्यधीश बनण्याचे लागलेले वेध या बदल्याच्या आगीतून सिनेस्टाइल चोरीचा कट रचला गेला. सेल्समनने अल्पवयीन (विधी संघर्षित बालक) नोकरासह काम करत असलेल्या सराफी पेढीतील दहा किलो सोनेलुटीचा मास्टर प्लॅन तयार केला. पण पोलिस अधीक्षक संजय दराडे व त्यांच्या ग्रामीण पोलिसांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 24 तासांत दोन कोटींचा ऐवज हस्तगत करत दसऱ्यापूर्वीच दरोड्याच्या खऱ्या सोनेलुटीचे प्रकरण निकाली काढले. 

पिंपळगाव बसवंतला भरवस्तीत श्रीनिवास ज्वेलर्स पेढीतील अल्पवयीन (विधी संघर्षित बालक) नोकराला नादी लावून तेथील आर्थिक कामकाजाची माहिती असलेल्या संजय वाघ या मास्टर माइंडने घटस्थापनेला पिंपळगाव बसवंत येथे (मुंबई-आग्रा महामार्गावर ऍक्‍सिस बॅंकेशेजारील) अशोक चोपडा यांच्या श्रीनिवास ज्वेलर्स पेढीच्या तळघरातील स्ट्रॉंगरूममधील तिजोरी उघडून तीन कोटी 16 लाख 50 हजारांच्या 10 किलो 475 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी सोन्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरा, केबल, सीसीटीव्ही फुटेजची तीन डीव्हीआर मशिन नेली. यामागे पेढीतील माहीतगाराचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यात पोलिस अधीक्षक दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक करपे,आशिष अडसूळ, राम कर्पे आदींच्या पथकाने दोन समांतर पातळ्यांवर तपास केला. दुकानातील सेल्समन, कारागीर, रोखपाल, सिक्‍युरिटी गार्ड व शिपाई अशा 14 कर्मचाऱ्यांवर तपास केंद्रित ठेवून या गुन्ह्याची उकल केली. 

कृत्यात अल्पवयीनाचा सहभाग 
दुकानात साफसफाई करणारा वैभव राजेंद्र जाधव या अल्पवयीन शिपायाचा यात सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्यामार्फत सगळ्या कटाचा छडा लावला. त्यात पेढीतील संजय देवराम वाघ (वय 32, रा. परसूल, ता. चांदवड) हा कटाचा सूत्रधार असल्याचे पुढे आले. त्याने अल्पवयीन वैभवच्या मदतीने 21 सप्टेंबरला रात्री चोरी केली. वैभव विधी संघर्षित बालक असून, 2015 पासून स्ट्रॉंगरूम उघडणे, सायंकाळी दुकान आवरून दागिने तिजोरीत ठेवण्यासह साफसफाई व पेढीच्या चाव्या वरच्या रूममध्ये ठेवणे, सकाळी चाव्या मालकास आणून देण्याचे महत्त्वाचे काम तो करायचा. पण वैभवचे काही दिवसांपूर्वी मालकाच्या मुलांशी भांडण झाल्याने ही संधी साधत संजय वाघने वैभवला हाताशी धरून स्ट्रॉंगरूमच्या तिजोरीची चावी मिळविली व भाच्याच्या मदतीने सगळे सोने विहिरीत व झुडपात ठेवल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. 

...आणि कट यशस्वी करण्यासाठी प्रयत्न 
मास्टर माइंड संजयने मालकाच्या मुलांशी भांडण झालेल्या वैभवशी सलगी वाढवत चोरीसाठी त्याला राजी केले. आठ दिवसांपूर्वी दोघांनी कट रचला. 21 सप्टेंबरला वैभवने सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर तिजोरीच्या चाव्या स्वतःजवळ ठेवून इतर चाव्याच सर्वांसमोर नेहमीच्या जागी ठेवल्याचा बनाव केला. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास वैभवने चिंचखेड फाटा येथे संजय वाघला तिजोरीच्या चाव्या दिल्या. वैभवकडून चाव्या मिळाल्यानंतर संजयने त्याच्या दुचाकीवरून रात्री मागील बाजूने दुकानात प्रवेश केला. छताची काच फोडून तळमजल्यावरील तिजोरीजवळ पोचला. त्यानंतर वैभवकडून मिळालेल्या चावीने तिजोरी उघडून 10 किलो 475 ग्रॅम सोन्याचे दागिने, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व डीव्हीआर मशिनच्या केबल कात्रीने कापून दोन डीव्हीआर मशिन, एक स्टॅबिलायझर अशा सुमारे तीन कोटी 16 लाख 49 हजारांच्या वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची बॅग परसूल (ता. चांदवड)ला जाऊन त्याचा भाचा गोपीनाथ दत्तू बरकले (25) याच्याकडे दिली. त्याचा भाचा गोपीनाथ बरकले याने त्यांच्या शेतातील विहिरीजवळ काटेरी झुडपात दागिने, तर डीव्हीआर मशिन विहिरीत फेकून दिले. पोलिसांनी आज विहिरीतून केबल, तर झुडपातील दागिने हस्तगत केले. 

पंधरा हजारांची बक्षिशी 
चोरीला गेलेला ऐवज व हस्तगत ऐवज यात तफावत आहे. त्यांपैकी एक किलो सोने सराफ व्यावसायिकाच्या घरात आढळले आहे. त्यामुळे नेमका ऐवज गेला किती याचा हिशेब लावण्याचे काम सुरू आहे. हिशेबानंतर नेमकी माहिती पुढे येईल. तसेच शीघ्र तपासाबद्दल स्थानिक गुन्हे शोध पथकाला 15 हजारांची बक्षिशी दिली जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले. 

Web Title: nashik news gold crime