‘जीएसटी’मुळे पूजेचे साहित्य,प्रसादाच्या किमतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

वणी - सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवास काल ललिता पंचमीनिमित्त उसळलेल्या गर्दीनंतर गडाने आज उसंत घेतली. दिवसभरात सुमारे वीस हजार भाविकांनी आदिमायेचरणी हजेरी लावली.

वणी - सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवास काल ललिता पंचमीनिमित्त उसळलेल्या गर्दीनंतर गडाने आज उसंत घेतली. दिवसभरात सुमारे वीस हजार भाविकांनी आदिमायेचरणी हजेरी लावली.

शारदीय नवरात्रोत्सवातील पाचवी माळ व ललिता पंचमी हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो. मात्र पंचांगानुसार ललिता पंचमी ही चौथ्या माळेसच आल्याने व सुटीचा दिवस असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने काल सकाळी सहापासून सुरू असलेल्या गर्दीच्या बाऱ्या रात्री बारापर्यंत सुरू होत्या. आज पाचव्या माळेस देवीची पंचामृत महापूजा निफाडचे आमदार अनिल कदम, कळवणचे तहसीलदार तथा न्यासाचे विश्‍वस्त कैलास चावडे यांनी सपत्नीक केली. आज भाविकांची गर्दी कमी असल्यामुळे गडावरील सर्वच यंत्रणा निश्‍चिंत होती. गडावर ठिकठिकाणी कचरा साठल्याने ग्रामपंचायत व न्यासाने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. 

दरम्यान, वस्तू व सेवाकरामुळे पूजेचे साहित्य, प्रसादाच्या किमतीतही वाढ झाल्याने भाविकांनाही नारळ, प्रसाद, हार, अगरबत्ती, कापराची वडी, एक चमचा हळद-कुंकू या पूजेच्या साहित्यात पंधरा ते वीस रुपयांनी वाढ झाल्याने, पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच गडावर प्लास्टिक बंदीमुळे कापडी पिशव्यांचा वापर व्यावसायिकांनी सुरू केल्याने त्याचेही सर्वसाधारण पाच रुपये अधिक भाविकांना द्यावे लागत आहेत. मागील वर्षी झेंडूच्या फुलांना भाव नसल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. त्यामुळे फुलांची आवक कमी असल्यामुळे एका क्रेटसाठी १७० ते २०० रुपये हार विक्रेत्यांना मोजावे लागत असल्याने हारांच्या किमतीतही वाढ झाली आहे. उद्या (ता. २६) सहावी माळ व मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. आज दिवसभरात न्यासाच्या प्रसादालयात सुमारे दहा हजारांवर भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला.

वस्तू व सेवाकरामुळे पूजेचे साहित्य व प्रसादाच्या किमतीत वाढ झाली आहे. कमी आवकेमुळे फुलांच्या किमतीही वाढल्या आहेत. भाविकांना कापडी पिशवीतूनच प्रसाद व पूजेचे साहित्य देत असल्यामुळे साहित्यानुसार दहा-वीस रुपयांवर किमतीत वाढ झाली आहे. 
-धनेश गायकवाड, विक्रेते