गिर्यारोहण करा, निसर्गाचे सौंदर्य अनुभवा..!

गिर्यारोहण करा, निसर्गाचे सौंदर्य अनुभवा..!

नाशिक - गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेले छोटे-मोठे सुमारे साडे तीनशे गड-किल्ले राज्यभरात आजही खुले आहेत. गड-किल्यांच्या पाहणीसाठी हौशींपासून तर तज्ज्ञ गिर्यारोहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; पण या गड-किल्यांवरील धोक्‍याच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी, छायाचित्र टिपण्याचा मोह अनेकांच्या जिवावर बेतत असून, प्लॅस्टिकच्या वापर, अन्य गैरप्रकारांमुळे नैसर्गिक ऱ्हास सुरू आहे. गिर्यारोहण करताना केवळ निसर्गाचा सौंदर्य अनुभवण्याचा उद्देश ठेवला, तर अनेक प्रश्‍न सुटू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

प्रत्येकाचे जीवन तणावाने ग्रासले असून, तणावमुक्‍तीसाठी पर्यटन, गिर्यारोहणाचा पर्याय लोकप्रिय होतोय. यातून ट्रेकर्सचे अनेक संघ, ग्रुपदेखील कार्यरत झाले आहेत. नियमितपणे गिर्यारोहण करणाऱ्यांपासून तर कधी तरी गिर्यारोहणाचा आनंद लुटणारे, असे वेगवेगळ्या स्तरावरील गिर्यारोहकांचा वावर गड-किल्ले परिसरात बघायला मिळतो. ‘विकएंड डेस्टिनेशन’ म्हणून या ठिकाणांना पसंती मिळत आहे. गिर्यारोहणाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणांची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी समजून घेण्यासह ठिकाणांचे जतन, संवर्धन होत असल्याची आनंददायी बाब आहे; परंतु दुसरीकडे वाढत्या गिर्यारोहणातून काही समस्यादेखील निर्माण होताय. गिर्यारोहणादरम्यान प्लॅस्टिकसह अन्य कचऱ्याचे वाढते प्रमाण निसर्गासाठी घातक ठरते आहे. याशिवाय उत्साही तरुणाईकडून या ठिकाणांवर मद्यसेवन व अन्य गैरप्रकारदेखील चिंतेचा विषय ठरतोय.

सहाय्य अन्‌ अर्थकारणालाही चालना
शहरी भागातून गिर्यारोहणासाठी दुर्गम भागात गिर्यारोहक जात असताना दुसरीकडे संबंधित ठिकाणासभोवतालची वस्ती मात्र उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित होते. गिर्यारोहकांनी विविध ठिकाणांची माहिती, ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांचे सहाय्य घेता येऊ शकते. याद्वारे त्यांना चार पैसे कमविण्याची संधी मिळेल अन्‌ गाव-पाड्याच्या अर्थकारणाला चालना मिळू शकते.

गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध ठिकाण
नाशिक जिल्ह्यात अंजनेरी, अलंग मदन कुरंग, पेंगलवाडी, ब्रह्मगिरी, हरिहर किल्ला, मांगी-तुंगी, साल्लेर-मुल्हेर, हतगड, मारकंड्या, कांचना, राजकोट, चांदवडचा किल्ला. पुणे जिल्ह्यात राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड, विशालगड यांसह महाबळेश्‍वर, नगर जिल्ह्यानजीकची कळसुबाई शिखराची रांग, रतनगड. कोकण विभागात सिंधुदुर्ग, अलिबाग, जयगड, चांदोली अभयारण्य परिसर, तसेच गाळणा, धुळे जिल्ह्यानजीक लळींग, विदर्भात रामटेक, सीताबर्डी, प्रसिद्ध महाल अशा गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध ठिकाणी गिर्यारोहकांची वर्दळ असते.

गेल्या काही वर्षांत गिर्यारोहणाचा छंद जोपासणाऱ्यांची संख्या वाढते आहे; पण काहींकडून मद्यसेवन व अन्य प्रकारांमुळे निसर्गाची हानी होते आहे. गिर्यारोहणाकडे केवळ सहल म्हणून न पाहता गड-किल्यांचा इतिहास जाणून घेण्यास प्राधान्य द्यावे. गिर्यारोहणावेळी सावधगिरी बाळगत जबाबदारीचे भान ठेवणेदेखील गरजेचे आहे.
-भाऊसाहेब कानमहाले, वैनतेय संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com