चोरीच्या ५२ लाखांच्या मुद्देमालाचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या घटनांची उकल होऊन त्यातील सुमारे ५२ लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप आज पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. विशेषतः या वेळी सोनसाखळी चोरट्याला एका महिलेने हिंमत दाखवून पकडले आणि त्याच्याकडून पोलिसांना नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. त्यामुळे सुनीता शांतीलाल सुराणा यांचाही सत्कार करण्यात आला. सोन्याचे दागिने, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, सिलिंडर असा ५२ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांतर्फे तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला. 

रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, अजय देवरे, विजयकुमार चव्हाण, अशोक नखाते उपस्थित होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी, संशयित चोरटे पकडण्यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेत असतात. संशयित पकडल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान असते. त्यातूनच गुन्ह्यांची उकल होत असते. असे सांगतानाच सोनसाखळी चोरट्याला पकडण्याचे धाडस दाखविणाऱ्या सुनीता सुराणा यांचे कौतुक केले. त्यानंतर २२ तक्रारदारांना त्यांचे सुमारे १३ लाख सहा हजार रुपयांचे दागिने वाटप करण्यात आले. तसेच २८ दुचाकी व एक चारचाकी वाहन असा ३० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. १३ तक्रारदारांचे ७७ हजार रुपयांचे मोबाईलही परत देण्यात आले. 

गेल्या २५ जानेवारीला सरकारवाडा पोलिस हद्दीतील टिळकवाडी भागात सुनीता शांतीलाल सुराणा यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सुनीता सुराणा यांनी धाडस दाखवून आरडाओरडा केला आणि यात एका संशयिताला पकडले. दुसरा फरारी झाला. पकडलेल्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याकडून आणखी नऊ गुन्ह्यांची उकल झाली.

गुन्ह्यांची उकल करणे हे पोलिसांचे कामच आहे. जनसेवेसाठीच पोलिस प्रशासन आहे. मात्र नागरिकांनीही पोलिसांकडे बिनदिक्कत तक्रार करावी. पोलिसांवर विश्‍वास दाखवावा. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होणे, संशयितांना शिक्षा होणे शक्‍य होणार आहे. 
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

व्यवस्थित झाकून रस्त्याने चाललो, तर संधीच चोरट्यांना मिळणार नाही. ज्याक्षणी असे काही घडते त्याचवेळी धाडस दाखविण्याची गरज असते. नंतर रडून काहीही होत नाही. पोलिसांविषयीचा दुराग्रहही समाजात खूप आहे. प्रत्यक्षात पोलिस यंत्रणा खूप सुधारली असून, या प्रकरणात मला सातत्याने प्रोत्साहनच त्यांच्याकडून मिळाले.
- सुनीता सुराणा