‘कालिदास कलामंदिर’ नाट्यावर अखेर पडदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - महाकवी कालिदास कलामंदिरावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत सुरू असलेल्या नाट्यावर आता कायमचा पडदा पडला आहे. १७ जुलैला होणारा नूतनीकरण आणि इतर कामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम दुसऱ्या जागी होणार असून, १५ जुलैपासून ‘कालिदास’ नूतनीकरणासाठी बंदच करणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले.

स्मार्टसिटी आणि अमृत योजनेंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी १५ जुलैला नाशिकचे कलावंत अभिवादनपर नाटक सादर करून नाट्यगृहावर पडदा टाकणार होते. मात्र, वाहतूक सेनेच्या कार्यक्रमासाठी कालिदास कलामंदिराची मागणी सेनेकडून करण्यात आली होती. पण, कलाकारांचा सन्मान राखत सेनेने हा कार्यक्रम इतरत्र हलविला होता. मात्र, त्यानंतर सत्ताधाऱ्यांतर्फे १७ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतनीकरण आणि इतर विकासकामांच्या ई उद्‌घाटनासाठी ‘कालिदास’ घेण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेना वाद हा महापालिकापर्यंत येऊन पोचला होता.

पण, आता महापालिका प्रशासनाकडून १७ जुलैला होणारा कार्यक्रम महापालिका कार्यालय अथवा गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह याठिकाणी घेण्यात येणार असून, १५ जुलैपासून कालिदास कलामंदिर हे नूतनीकरणासाठी एक वर्षापर्यंत बंद राहणार असल्याचे महापालिका आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केल्याने आता या वादावर कायमचा पडदा पडला आहे.