माजलगाव धरणात युवकांनी घेतल्या उड्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पाणी प्रश्न पेटला ः अकरा गावांतील पाणीपुरवठा बंदच

माजलगाव : शहरालगतच्या 11 पुनर्वसित गावांमधील पाणीपुरवठा नगरपालिकेने बंद केल्याने या गावांतील युवकांनी शनिवारी धरणाच्या जलाशयात उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल खर्चातील 60 टक्के वाटा माजलगाव नगरपालिकेने, तर 40 टक्के वाटा अकरा पुनर्वसित खेड्यांनी भरावा, असे जिल्हाधिकारी समितीने ठरवून दिले; परंतु 11 गावांतील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी मागील वीस दिवसांमध्ये या वाट्यापैकी एकही रुपया भरला नाही. पालिका प्रशासनाने वाटा भरेपर्यंत गावांचा पाणीपुरवठा बंद राहील, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायत व पालिकेच्या वादामध्ये या गावातील ग्रामस्थ वीस दिवसांपासून पाण्यापासून वंचित आहेत.

पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास या गावांतील युवकांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने अखेर मुक्तीराम आबुज, गणेश मारगुडे, विकास कांबळे, महादेव आबुज, पांडुरंग आबुज, विजय नरहीर, प्रकाश वाघमोडे, अनिल कांबळे, सिद्धार्थ सातपुते या युवकांनी माजलगाव जलाशयातील पाण्यात उडी घेऊन पाणीप्रश्नी संताप व्यक्त केला.