गोदावरी गौरव पुरस्कार आम्हासाठी दैवी प्रसाद

गोदावरी गौरव पुरस्कार आम्हासाठी दैवी प्रसाद

नाशिक - आपल्या उच्चतम कामगिरीने इतरांसमोर आदर्शवत कार्य उभे करणाऱ्या किंबहुना समाजविकास व तळागाळातील व्यक्तींच्या संगोपन, जडणघडणीसाठी झटणाऱ्या, तसेच वेगळ्या वाटा चोखळणाऱ्या महानुभवांना शनिवारी (ता. १०) गोदावरी गौरव पुरस्कार देऊन त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कविवर्याच्या, तसेच आपल्या कामातील अनुभव सांगताना पुरस्कारार्थी आणि ओलावलेल्या रसिकांच्या डोळ्यांच्या कडा... अशा वातावरणात हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. 

रावसाहेब थोरात सभागृहात हा सोहळा रंगला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी महापौर रंजना भानसी, उपाध्यक्ष संजय पाटील, अरविंद ओढेकर, विनायक रानडे, गुरूमित बग्गा, डॉ. विनय ठकार, डॉ. कुणाल गुप्ते आदी उपस्थित होते. श्री. कर्णिक यांच्या हस्ते डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे (लोकसेवा), डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान), सुभाष अवचट (चित्र, शिल्प), पं. सत्यशील देशपांडे (संगीत), अमोल पालेकर (चित्रपट, नाट्य), सुदर्शन शिंदे, महेश साबळे (साहस) या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

श्री. कर्णिक म्हणाले, की कुसुमाग्रजांचे स्मरण कदापिही संपणारे नाही. ‘जाता जाता गाईन मी’ असे त्यांनी सांगितले होते. कुसुमाग्रज माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. कवित्व त्यांचा श्‍वास होता. समाजाकडे अत्यंत व्यापक दृष्टीने त्यांनी पाहिले. त्यांनी संपूर्ण जीवनावर, समाजावर प्रेम केले. प्रेम हे जगातील संस्कृतीचा सारांश आहे, असे त्यांनी म्हटले होते. ते कला, शिक्षण, चित्र, नृत्यातून व्यक्त होत असते. प्रेमाची त्यांनी आयुष्यभर सर्वांवर उधळण केली. कुसुमाग्रज हे तुमच्या-आमच्या पिढीतील शेवटची अशी व्यक्ती आहे ज्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा आणि त्याचा प्रसाद ग्रहण करावा आणि तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे एक प्रसाद असून, तुमच्या कलेचा मोठा सन्मान आहे. कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. कवी किशोर पाठक यांनी पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला.

कुसुमाग्रजांनी माझ्या पिढीला प्रेरणा दिली. सत्तरच्या दशकात आम्ही पहिल्यांदा भेटलो. मी त्यांच्याच कविता त्यांना ऐकविण्याचे धाडस केले. ‘माझ्या कवितेवर तुम्ही प्रेम करतात’, असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी अवाक झालो. ‘नटसम्राट’ला मी क्‍लासिक मानायला तयार नाही. त्यातील स्वगत एकाच पठडीत म्हणावी लागतात. तात्या माझी मतं तुम्हाला आवडली नसतील. तेव्हा ते म्हणाले, की माझ्या शब्दांवर तुम्ही खूप विचार करतात. तो विचार कसा नाकारता येईल. 
- अमोल पालेकर (चित्रपट, नाट्य) 

पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो ते फार महत्त्वाचे आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले; पण या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे. जुन्या नव्यांची सांगड कशी घालायची, हे फक्त कुसुमाग्रजांनाच जमू शकते. शिक्षण माणुसकीचा आधार घेत झाले पाहिजे. पहिल्यांदा तात्यांना १९९० मध्ये भेटले. कुलगुरू असताना आईचे नाव वडिलांच्या बरोबरीने असले पाहिजे, असा आग्रह धरला होता. हा पुरस्कार मी आईलाच अर्पण करते.
- डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान)

 

मी एक उच्च विद्याविभूषित असलेली डॉक्‍टर जेव्हा रवींद्र कोल्हेंबरोबर लग्न होऊन आदिवासी भागात गेली तेव्हा तेथील संस्कृतीची जाणीव झाली. त्या ठिकाणी स्त्रीभ्रूणहत्या नाहीच. तिथे अजूनही स्त्रीला सन्मान दिला जातो. मुलींच्या जन्माचा उत्सव होतो. ‘अतिथी देवो भवः’ ही संस्कृती ते जोपासतात. वृद्धाश्रम नाही, अनाथालय नाही. एक कुपोषित बालक त्या ठिकाणी एका कुटुंबाचा आधार होऊ शकतं, हे त्या ठिकाणी पाहिले. 
- डॉ. स्मिता कोल्हे (लोकसेवा)

 

कुसुमाग्रज आणि भेट कॉन्टीनेंटल प्रकाशन, पुणे येथे पहिल्यांदा झाली होती. मला आतापर्यंत अनेक पारितोषिके मिळाली; पण या शब्दमहर्षींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार महत्त्वाचा वाटतो. तात्यासाहेबांमुळे मी अनेकदा नाशिकला आलो. निसर्गाचे अतिशय सुंदर मिश्रण येथे आहे. येथील डोंगरांनी मला आकर्षित केले आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद जसा आहे, तसेच आज कुसुमाग्रज नाही याची खंतही आहे. 
- सुभाष अवचट (चित्रकला) 

 

चौदा वर्षांपासून पोलिससेवेत आहे. पोलिस विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अग्नितांडव  झाले तेव्हा भीती वाटली नव्हती. पोलिसांचे टीमवर्क 
असते. पोलिसांना वेळोवेळी शाबासकीची थाप मिळणे आवश्‍यक आहे. आई म्हणायची, की ‘जीओ तो शेर बनके जीओ’, हे वाक्‍य कायम लक्षात राहिले. त्यामुळे हा पुरस्कार आईलाच अर्पण. 
- सुदर्शन शिंदे (साहस)


मी कुसुमाग्रज पाहिलेला माणूस आहे. तात्यासाहेबांमुळे माझे विचार स्पष्ट झाले. माझे काका नाशिकला राहत असताना त्यांच्यासोबत मी अनेकदा तात्यांकडे जात असे. त्यांच्यासमोर काही बंदिशी सादर केल्या होत्या. त्या त्यांना खूप आवडल्या. समाजातल्या नागरिकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्याचे काम सध्या करतो आहे. संगीतशिक्षकांची फौज निर्माण करून त्यांच्यामार्फत संगीत विचार सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- पं. सत्यशील देशपांडे (संगीत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com