भारत पेट्रोलियमचे वाहतूकदार संपावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मनमाड - वाहतुकीचे दर वाढविण्याचे आश्‍वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारे टॅंकरचालक आज संपावर गेले. या संपामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. 

मनमाड - वाहतुकीचे दर वाढविण्याचे आश्‍वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारे टॅंकरचालक आज संपावर गेले. या संपामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. 

येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे भारत पेट्रोलियम कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे 400 टॅंकरद्वारे मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 13 जिल्ह्यांतील पंपांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. इंधनपुरवठा करण्यासाठी कंपनीकडून वाहतूकदारांकडून निविदा मागवली जाते. मात्र, निविदेच्या दरावरून वाहतूकदार व कंपनीच्या प्रशासनात सतत वाद निर्माण होतो. आताही वाहतुकीच्या दरावरून कंपनी व वाहतूकदारांत वाद निर्माण झाल्याची माहिती टॅंकर वाहतूकदार चालक-मालकांनी दिली. 

भारत पेट्रोलियम सध्या वाहतूकदारांना 27.72 रुपये दर देत आहे. वाहतूकदारांना हा दर मान्य नसून त्यांना तो वाढवून हवा आहे. याच कारणावरून इंधन वाहतूकदारांनी 12 तारखेपासून संपाचा इशारा दिला होता. पण संपाची तातडीने दखल घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपकऱ्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेत दर वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. मात्र, वाहतूकदार मागत असलेला दर कंपनीला परवडणारा नसल्याचे सांगत भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हात झटकल्याचे संतप्त झालेल्या इंधन वाहतूकदार मालक-चालकांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. 

पश्‍चिम महाराष्ट्राला फटका 
या संपामुळे पानेवाडी प्रकल्पातून राज्यातील 13 जिल्ह्यांना होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भारत पेट्रोलियम कंपनी जोपर्यंत इंधन वाहतुकीचे दर वाढवून देत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे. या संपामुळे मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील सर्व 13 जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे.