लग्नसमारंभाचा खर्च पडणार महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दिसणार परिणाम

दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दिसणार परिणाम

नाशिक - देशभरातील करप्रणालीत एकसंघपणा यावा म्हणून केंद्र शासनाने १ जुलैपासून देशात जीएसटी प्रणाली लागू केली आहे. त्याचा परिणाम लग्नसमारंभांवर होणार आहे. सर्वसामान्य माणूस मुलीच्या लग्नासाठी पै पै जमा करीत असतो. जीएसटीनंतर आता दागदागिने, वातानुकूलित हॉल, केटरिंग, कपडे, डेकोरेशन, चप्पल यांसारख्या वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने लग्नसमारंभाचा खर्च अधिक महागणार आहे. एक हजारापेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केल्यास १२ टक्के कर, डेकोरेशनसाठी १८ टक्के कर मोजावा लागणार आहे. मागील वर्षी लग्नसराईत नोटबंदीचे सावट होते. यंदाच्या लग्नसराईत जीएसटीचे परिणाम दिसून येणार आहेत. 

हॉटेल आणि लग्नकार्यासाठी हॉल बुक करायचा असल्यास याआधी त्यावर २१-२५ टक्के कर द्यावा लागत होता. मंगल कार्यालयाला आता १८ टक्के कर भरावा लागेल. लग्न जर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करावयाचे झाल्यास २८ टक्के कर भरावा लागणार आहे. 

केटरिंग : जीएसटी लागू झाल्यानंतर खाण्याच्या काही वस्तू स्वस्त, तर काही महाग होतील. दूध, मीठ, ताजी फळे, पापड, गहू यांसारख्या वस्तूंवर शून्य कर लागणार आहे. चहा, कॉफी, खाद्यतेले, ब्रॅन्डेड पनीर, ब्रॅन्डेड गहू, एलपीजी सिलिंडर या वस्तूंवर पाच टक्के कर लागणार आहे. सुकामेवा, तूप, लोणी, नमकीन, मासे यावर १२ टक्के, तर आईस्क्रीम, सॉस, सूप, मिनरल वॉटरवर १८ टक्के कर लागणार आहे.

खरेदीनुसार आता खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू झाल्यानंतर केटरिंगचा खर्च वाढणार आहे. सर्वसामान्य माणसाला याचा खूप मोठा फटका बसणार आहे. मुलीच्या वडिलांना लॉन्स, डेकोरेशन, दागिने, कपडे व केटरिंग या सर्वच गोष्टींवर कर भरावा लागणार आहे. यामुळे लग्नाचे बजेट कोलमडणार आहे. मुलीचे वडील लग्नाचा खर्च करेल की करच भरत राहील?
- उत्तमराव गाढवे, अध्यक्ष, केटरिंग असोसिएशन आणि इच्छामणी केटरर्स

सध्या तरी कोणतीही वाढ केलेली नाही कारण सध्या लग्नाचा हंगामपण फारसा नाही. त्यामुळे ऑक्‍टोबरनंतर रेटकार्ड ठरविण्यात येणार आहे. याआधी वातानुकूलित हॉलला १५ टक्के कर मोजावा लागत होता; तो आता जीएसटीनंतर २८ टक्के मोजावा लागेल.- प्रशांत निमसे, यश लॉन्स

दागिन्यांवर कर
लग्नसमारंभात दागिन्यांना सर्वाधिक महत्त्व असते. जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर ३ टक्के, त्यानंतर दागिन्यांच्या मजुरीवर ५ टक्के जीएसटी लागणार आहे. सध्या सोन्यावर सहा टक्के कर लागतो. एक तोळे सोन्याला २८ हजार रुपये भाव असल्यास ३०० रुपये कर लागत होता. तो जीएसटीनंतर ९०० रुपये असेल.