खासगी ट्रॅव्हल्सना ‘एसटी’ देणार टक्कर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक - पायाभूत सुविधांचा विकास करताना जिल्हाभरातील बसस्थानकांचे नूतनीकरण, महत्त्वाच्या बसस्थानकांचा बसपोर्ट विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

नाशिक - पायाभूत सुविधांचा विकास करताना जिल्हाभरातील बसस्थानकांचे नूतनीकरण, महत्त्वाच्या बसस्थानकांचा बसपोर्ट विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

सोबतच सामान्य, निमआराम बसगाड्यांच्या जोडीला शिवशाही बसगाड्या, स्लिपर कोच गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रवाशांना दर्जेदार सुविधा देताना एसटी महामंडळ आगामी काळात ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना टक्‍कर देण्यास सज्ज झाले. आगामी चार वर्षांत महामंडळाच्या बसस्थानकांमध्ये आमूलाग्र बदल दिसणार आहे. महामंडळांतर्गत ५० शिवशाही बसगाड्या नाशिक विभागाला मिळणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गांसह अन्य विविध ठिकाणी या गाड्या सुरू होतील. निमआरामपेक्षा किरकोळ प्रमाणात जादा भाडे आकारून प्रवाशांना दर्जेदार प्रवास करता येणार आहे. प्रत्येक तालुका स्तरावरील बसस्थानकाचाही विकास केला जाईल. सिंहस्थात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास झालेला असताना त्यात सातत्य ठेवले जात आहे. मेळा बसस्थानक महामंडळातर्फे, तर महामार्ग बसस्थानक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर विकसित केले जात आहे.

पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह बससेवा सुधारण्यावर महामंडळाचा भर आहे. या माध्यमातून प्रवासी एसटी महामंडळाच्या सेवेचा अधिकाधिक लाभ घेतील व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. खासगी व्यावसायिकांपेक्षा दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत आहोत. 
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

धार्मिक पर्यटनाला चालना
पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील विविध जिल्हे त्र्यंबकेश्‍वरला जोडण्यात आले आहेत. यानिमित्त नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे कार्य एसटी महामंडळातर्फे केले जात आहे.