‘स्वीकृत’च्या नावांसाठी अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नाशिक - महापालिका निवडणूक होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्याप स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झालेली नाही. प्रशासनाने आता दोन दिवसांत सदस्यांची नावे देण्याचे आवाहन भाजप व शिवसेनेला केले आहे. वेळेत नाव न मिळाल्यास तौलनिक संख्याबळानुसार अन्य पक्षांना संधी देता येईल का, याबाबत कायदेशीर मत मागविणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत झाली. त्यानंतर महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक झाली. नियमानुसार महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या एक महिन्यानंतर पहिली सभा होईल. त्या वेळी गटनेत्यांची बैठक घेऊन स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करावी लागते. पण अद्याप स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर झाली नाहीत. महापालिकेत भाजपचे ६६ व त्यापाठोपाठ शिवसेनेचे ३५ नगरसेवक आहेत. तौलनिक संख्याबळाचा विचार करता पाचपैकी भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य निवडून द्यायचे आहे. अद्याप नावे निश्‍चित होत नाहीत. प्रशासनाकडून ऑगस्ट व सप्टेंबर अशा दोन तारखा नावे सादर करण्यासाठी देण्यात आल्या होत्या, पण नावे न आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे भाजपच्या विनंतीवरून शिवसेनेने नावे सादर केली नसली, तरी चार सदस्यांची नावे घोषित करून भाजपवर कडी केली आहे. प्रशासनाला अधिक मुदत वाढविता येत नसल्याने स्वीकृतसाठी दावेदार असलेल्या पक्षांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार असल्याचे समजते.