म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदावर घोलपांचा ताबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - महापालिका म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदाला आज वेगळे वळण मिळाले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज संघटनेच्या अध्यक्षपदावर स्वतः ताबा घेऊन कार्यालयात ठाण मांडल्याने शिवसेनेत नव्या वादाला सुरवात झाली. विद्यमान अध्यक्ष ॲड. शिवाजी सहाणे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच घोलप यांनी स्वतःच अध्यक्ष असल्याचे घोषित केल्याने संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे.

शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून आठ दिवसांपासून वाद सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. सहाणे यांना डावलून बबनराव घोलप यांनी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या नावाची घोषणा केली होती. परंतु, घटनेत पद रिक्त असेल तरच नवीन निवड करता येत असल्याचा दावा करीत ॲड. सहाणे यांनी तिदमे यांच्या निवडीला विरोध केला होता. या सर्व प्रकरणात शिवसेनेची बदनामी होत असल्याने महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या बैठकीत सहाणे व तिदमे यांच्यात सलोखा घडवून आणण्यात यश आले. उद्या (ता. २६) संघटनेची बैठक होईल. त्यात सहाणे राजीनामा देतील. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांमधून नवीन अध्यक्षपदाची नियुक्ती केली जाईल, असे ठरले. परंतु, एक दिवस आधीच श्री. घोलप यांनी आज सकाळी संघटनेच्या कार्यालयाचा ताबा घेऊन आपणच अध्यक्ष असल्याचे जाहीर केले. अध्यक्षपदाच्या वादात महानगरप्रमुख बोरस्ते यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले. बाहेरील व्यक्तीही संघटनेची अध्यक्ष होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

संघटना एक, अध्यक्ष तीन
ॲड. शिवाजी सहाणे यांनी राजीनामा दिला नसल्याने सध्या तरी संघटनेचे तेच अध्यक्ष आहेत. दुसरीकडे बबनराव घोलप यांनी प्रवीण तिदमे यांना अध्यक्षपदाचे पत्र दिल्याने तेही अध्यक्ष मानले जात आहेत. आता आज श्री. घोलप यांनी संघटना कार्यालयाचा ताबा घेतलाच, शिवाय संस्थापक अध्यक्ष या नात्याने स्वतःचीच पुन्हा अध्यक्ष म्हणून घोषणा केल्याने तेही अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे संघटना एक व अध्यक्ष तीन अशी स्थिती झाली आहे.

संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मीच आहे. मंत्रिपद मिळाल्याने अशोक गवळी, उदय थोरात व त्यानंतर ॲड. सहाणे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. सहाणेंनी असमर्थता दर्शविल्याने तिदमे यांना नियुक्तीचे पत्र दिले. परंतु, या नियुक्तीला विरोध झाल्याने मीच अध्यक्षपदावर विराजमान झालो आहे.
- बबनराव घोलप, संस्थापक अध्यक्ष, कर्मचारी-कामगार सेना