नाशिक महापालिकेत पदे तीन, इच्छुक दोनशे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नाशिक - महापालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत असताना स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती तत्काळ होणे अपेक्षित आहे. मात्र, स्वीकृत पदांसाठी इच्छुकांच्या संख्येचा आकडा तब्बल दोनशेवर पोचल्याने निवड करायची कोणाची, या प्रश्‍नाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पिच्छा पुरविला आहे. त्यातूनच हा विलंब होत आहे.

फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. नंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या सदस्य व सभापतींची नियुक्तीही झाली. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकांची निवड कधी होईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महापालिका सभागृहात संख्याबळानुसार पाच स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात भाजपला तीन, तर शिवसेनेला दोन नगरसेवक नियुक्त करण्याची संधी आहे. निवडीसाठी महासभा बोलाविण्याचा अधिकार महापौरांचा आहे; परंतु शहराध्यक्षांकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोवर सभा बोलावली जाणार नाही. भाजपच्या शहर कार्यालयात स्वीकृतसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे शर्यतीत असणाऱ्या दहा ते पंधरा सदस्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे निवडीला विलंब होत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपचे शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्‍य साने, सुनील आडके, कार्यालयीनप्रमुख अरुण शेंदुर्णीकर, सुजाता करजगीकर, भारती बागूल यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.