'अंनिस'च्या प्रसारासाठी "निळू फुले फिल्म सर्कल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या नवव्या स्मृती दिनापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर करून समाजात चळवळीचा विचार पोचविण्यासाठी "निळू फुले फिल्म सर्कल'ची स्थापना करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र "अंनिस'चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज दिली.

"अंनिस'च्या प्रेरणा मेळाव्यासाठी पाटील नाशिकला आले होते, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महेंद्र दातरंगे, प्रभाकर धात्रक, प्रा. सुदेश घोडेराव होते. पाटील म्हणाले, की "अंनिस'च्या कार्यात अभिनेते निळू फुले यांचे योगदान मोठे होते. नव्या पिढीला त्यांची ओळख करून देण्यासाठी 13 जुलैला त्यांच्या नवव्या स्मृतिदिनी "निळू फुले फिल्म सर्कल'ची स्थापना केली जाईल. समितीच्या सांस्कृतिक विभागातर्फे हे सर्कल कार्यरत राहील. "जातिप्रथेविरुद्ध बनवा लघुपट, माहितिपट, ऍनिमेशनपट' ही विवेक लघुपट स्पर्धा होईल.''

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीदिनी एक नोव्हेंबरला पारितोषिक वितरण होईल. दरम्यान, 20 ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनी 12 राज्यात निषेध सत्याग्रह आंदोलन केले जाईल. डॉ. दाभोलकर, पानसरे व कुलबर्गी यांच्या हत्येचा निषेध करत प्रभावी जागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.