आयुक्तांच्या समर्थनार्थ अधिकारी, कर्मचारी मैदानात

आयुक्तांच्या समर्थनार्थ अधिकारी, कर्मचारी मैदानात

काळ्या फिती लावून निषेध - लेखणीबंद आंदोलन, आर्किटेक्‍ट- बिल्डरांचाही आंदोलनात सहभाग

नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल (ता. २४) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत व काही काळ लेखणीबंद आंदोलन केले. आर्किटेक्‍ट, बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनीसुद्धा आज आयुक्तांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.

अपंगांचा ३ टक्के राखीव निधी खर्च करण्याच्या विषय सुरू असतानाच आमदार कडू व आयुक्त कृष्णा यांच्यात शाब्दिक खडाजंगी होऊन शिवीगाळ व हात उचलण्यापर्यंत प्रकरण गेले. अपंगांच्या समस्या बाजूला राहून आयुक्त, आमदार कडू यांच्या वादाचीच चर्चा आज दिवसभर होती. सर्वांत आधी बिल्डर लॉबी आयुक्तांच्या समर्थनार्थ आज रस्त्यावर उतरली. 

महापालिकेचे मुख्यालय उघडत नाही तोच आयुक्तांना भेटण्यासाठी बिल्डरांची रीघ लागली. आयुक्तांना भेटण्यासाठी बिल्डर्स पोचत नाही तोच आयुक्तांना मिळणारे समर्थन बघून नाशिक म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने काळ्या फिती लावून व लेखणीबंद आंदोलन पुकारले. मुख्यालयाच्या पायऱ्यांवर अधिकारी व कर्मचारी जमले. आ. कडू यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

पदाधिकारीही पाठीशी 
या आंदोलनाला प्रतिसाद मिळत असतानाच पदाधिकारीसुद्धा कार्यकर्त्यांसमवेत दाखल झाले. या वेळी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे म्हणाले, की महापालिकेत येऊन दादागिरी करण्याचा अधिकार कोणाला नाही. यापुढे धक्काबुक्की खपवून घेणार नाही. महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी यापुढे कडू यांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, पश्‍चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी आयुक्तांना पाठिंबा दर्शविला.

शिष्टमंडळांसाठी आचारसंहिता
सोमवारच्या घटनेनंतर पालिकेतील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळातील पाच सदस्यांनाच आता दालनात सोडले जाणार आहे. या संदर्भात शासन निर्णयाचा आधार घेतला जाणार आहे.

मेघवाळ मेहतर संघर्ष समितीतर्फे निषेध 
महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारल्याचा वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीतर्फे निषेध करण्यात आला. आयुक्त हे प्रशासकीय सेवेतील संवैधानिक पद आहे. या पदावरील अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई किंवा कामे न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी लोकप्रतिनिधींना विधानसभा व मंत्रालयासारखे व्यासपीठ आहे. त्याठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू शकतात. पण आमदार कडू यांनी कायदा हातात घेऊन महापालिका आयुक्तांवर धावून जाणे योग्य नाही. वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समिती, मनपा सफाई कामगार संघटनेचे सुरेश मारू, सुरेश दलोड यांनी निषेध नोंदविला.

आमदार कडू यांच्या वागण्यातून बेजबाबदारपणा समोर आला आहे. अपंगांसाठी अंदाजपत्रकात १४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही बाब कडू यांनी समजून घेणे आवश्‍यक होते. आयुक्त कृष्णा सकारात्मक काम करत आहेत. कडू यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे.
- रंजना भानसी, महापौर

महापालिकेच्या दृष्टीने सोमवारचा दिवस काळा दिन ठरला. आमदार कडू यांना प्रश्‍न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असताना त्यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांवर हात उचलणे निंदनीय आहे. आयुक्तांवर हात उचलून महापालिकेच्या स्वाभिमानावरच केलेला हा हल्ला सहन करणार नाही.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com