कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून सरकारचा शेतकऱ्यांवर दरोडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नाशिक - कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकारने प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून भाव पाडले आहेत. सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांवर टाकलेला दरोडा आहे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार कडू यांनी येत्या पंधरा दिवसांत कांदा उत्पादकांची परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका केली. आमदार कडू म्हणाले, की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऑगस्टमध्ये चांगले भाव मिळू लागल्यानंतर सरकारने आधी कांदा साठवणुकीवर मर्यादा घालणारा निर्णय घेतला. त्यानंतर 5 सप्टेंबरला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कांदा व्यापाऱ्यांवर छापा टाकण्याच्या सूचना दिल्या. नाशिक जिल्ह्यातील केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर छापे टाकले म्हणजे लिलाव ठप्प होऊन कांद्याचे भाव पडतील, हाच शासनाचा यामागे हेतू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले, की सरकारने एकतर कांद्याला जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळावे किंवा कांद्याला हमीभाव द्यावा, ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही 15 दिवसांत चांदवडला कांदा परिषद घेणार आहोत. या परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन उभारणे व पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे यावर चर्चा होईल. आगामी काळात मंत्र्यांवर हल्लाबोल करण्याचा आमचा विचार असून, त्यांची वाहने अडविण्याचे आंदोलन केले जाणार असल्याचेही श्री. कडू यांनी स्पष्ट केले.