कांदा उत्पादकांना 'अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांनी आपला कांदा टप्प्याटप्प्याने आणावा. जेणेकरून आम्हाला माल घेणे व योग्य भाव देणे परवडेल. सकाळच्या तुलनेत दुपारी प्रचंड आवक झाल्याने भावात चढ-उतार झाला.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

नामपूरला यंदाच्या हंगामातील सर्वोच्च 2700 रुपये भाव
नाशिक - लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणेसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज उन्हाळ कांद्याला सरासरी 2200 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. नामपूर बाजार समितीत यंदाच्या हंगामातील सर्वोच्च म्हणजे 2700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. विक्रमी भावानंतर दुपारनंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावला काही वेळ कांद्याचे लिलावच बंद पाडले. दुसरीकडे उमराणे बाजार समितीत एकाच दिवशी 25 हजार क्विंटल कांदा आवक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बागलाण तालुक्‍यातील नामपूर बाजार समितीत दिवसभरात एकूण नऊ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उमराणे बाजार समितीत परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. येथे 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सर्वोच्च 2500 व सरासरी 2200 रुपये भाव मिळाला.

लासलगाव बाजार समिती आवारात सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळातच कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम म्हणजे 2631 रुपये भाव मिळाला; मात्र दुपारनंतर एकदम आवक वाढल्याने भावात 2631 वरून थेट 1700 रुपये अशी घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद पाडले. लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, बी. वाय. होळकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले.

Web Title: nashik news onion producer acche din