घरबसल्या करा पोलिसांकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते. त्यामुळे अनेकांना तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात हेलपाटेही मारावे लागतात. मात्र, आता तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाने "सिटीझन पोर्टल' कार्यान्वित केले असून, यावर घरबसल्या तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दखल संबंधित पोलिस ठाण्याला घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिस तत्काळ संबंधितांशी संपर्क साधून गुन्हा दाखल (एफआयआर) करून घेतील. याच ई-पोर्टलवरून एफआयआरच्या माहितीसह हरविलेले, अनोळखी मृतदेहाचीही माहिती मिळू शकणार आहे. 

नाशिक पोलिस आयुक्तालयात गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस दलाच्या "ई-पोर्टल'चे उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी त्यांनी सांगितले की, www.mhpolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलिस दलातर्फे 23 सुविधा सुरू करण्यात आल्या असून, यातील नऊ सुविधांसाठी संबंधित व्यक्तीला लॉगिन आयडी/पासवर्डची आवश्‍यकता असणार नाही, तर 13 सुविधांसाठी मात्र स्वत:ची नोंदणी करून लॉगिन आयडी/पासवर्ड गरजेचा आहे. यामुळे राज्यभरातील पोलिस ठाण्यांतील महिलांशी संबंधित व संवेदनशील गुन्हे वगळता अन्य दाखल गुन्ह्यांची माहिती मिळू शकेल. यातून पोलिस दलाचे काम वाढणार असले, तरी ती काळाची गरज असून, घरबसल्या संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी जाण्याची गरज नाही; मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात जावे लागेल. 

एक लाख 20 हजार पोलिसांना प्रशिक्षण 
"ई-पोर्टल'साठी राज्यभरातील 1 लाख 20 हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणेशोत्सव-नवरात्रोत्सवाच्या परवानगीसाठीही अर्ज ई-पोर्टलवर करता येणार आहेत. "ई-पोर्टल'वर मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार करता येणार आहे. मात्र, मोबाईल चोरीला गेल्यास तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार आहे.