मध्य रेल्वे धीम्या गतीने ट्रॅकवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नाशिक रोड - पाच दिवसांपासून विस्कळित झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंदजवळ अपघातात उखडलेले रेल्वेरुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीतील सर्वच अडसर दूर झाले आहेत. परंतु, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामाख्या आदी गाड्या रद्दच आहेत. पंचवटी, गोदावरी, मंगलापाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.

सहा दिवसांपूर्वी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसला आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान अपघात झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या वाशिंदजवळ येताच डाउनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किलोमीटर गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु राज्यराणी पाच दिवस बंद होती. राज्यराणी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी जोर लावल्याने तीही आजपासून सुरू झाली. दोन्ही मार्ग खुले झाल्याने ही गाडी आज मुंबईला रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना पहाटे भुसावळ-पुणे गाडी आहे. ती पाच दिवस दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात येत होती. आजपासून ही गाडीदेखील नाशिकमार्गे धावू लागल्याने पुण्याला जाणाऱ्या नाशिककरांची गैरसोय दूर झाली आहे.