मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाच्या श्रेयवादाबद्दल भाजपमध्ये सुंदोपसुंदी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नाशिक - मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेबद्दलची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या साक्षीने धुळ्यात दिली; पण नेमक्‍या याच कार्यक्रमात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अनुपस्थित राहिले. त्यावरून रेल्वेमार्गाच्या श्रेयवादाबद्दल भाजपमधील सुंदोपसुंदी पुढे आली आहे. 

नाशिक - मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेबद्दलची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या साक्षीने धुळ्यात दिली; पण नेमक्‍या याच कार्यक्रमात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अनुपस्थित राहिले. त्यावरून रेल्वेमार्गाच्या श्रेयवादाबद्दल भाजपमधील सुंदोपसुंदी पुढे आली आहे. 

रेल्वेमार्गाच्या मंजुरीवरून इतर श्रेय घेण्याचा प्रयत्न करून कार्यक्रम "हायजॅक' करत असल्याचा आरोप श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यासंदर्भातील पत्रकबाजी नाशिकमध्ये झाली. रेल्वेमार्ग सर्वेक्षणापासून ते आर्थिक तरतुदीपर्यंत श्री. चव्हाण यांनी 2004 पासून प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना 13 जुलै 2014 पासून लोकसभेत नियम 377 अन्वये प्रश्‍नाला त्यांनी वाचा फोडली होती. तेव्हापासून अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठीची तरतूद आणि मंजुरीसाठी तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती, रेल्वेमंत्री यांच्याकडे सतत त्यांनी पाठपुरावा केला. 

22 जुलै 2004 ला लोकसभेत कुठला रेल्वेमार्ग करणार यावर तत्कालीन सरकारला श्री. चव्हाण यांनी धारेवर धरले होते. 22 डिसेंबर 2015 ला लोकसभेत सर्वेक्षणासाठी आग्रह धरला. 10 ऑगस्ट 2006 ला लोकसभेत मनमाड-शिरपूर-नरडाणा-इंदूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण कधी करणार, यावर आवाज उठवला. 2009 ला लोकसभेत पहिल्याच दिवशी प्रश्‍न विचारून श्री. चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडले. 2013 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 350 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंजुरी दिली. हा सारा पट श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनी पत्रकात उलगडला आहे. 

खासदार चव्हाणांमुळेच घोषणा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सर्वेक्षणाचा अभ्यास करून खासदार चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गास मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. रेल्वेमार्गासाठी धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनीही श्री. चव्हाण यांच्यासमवेत पाठपुरावा केल्याचा उल्लेख पत्रकात आहे. आज मात्र श्री. प्रभू यांच्यासमवेत श्री. गोटे होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. एवढेच नव्हे, तर मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे आल्याचे शल्य श्री. चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये आहे. एवढ्यावरच न थांबता रेल्वेमार्गाची मुहूर्तमेढ श्री. चव्हाण यांनी रोवल्याचे समर्थक ठासून सांगत होते.