विकासकामे केल्यानेच बडगुजरांना सर्वाधिक मते - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक  - नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्यानेच जनतेने त्यांना सर्वाधिक मतांची पावती दिली आहे. कामेच जनतेला दिसत असतात. शिवसेनेने महानगराचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी नगरसेवक कल्पक कामे करीत आहेत. विरोधात असले, तरी विकासाची दिशा देण्यात ते मागे नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी  कालयेथे केले. 

नाशिक  - नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्यानेच जनतेने त्यांना सर्वाधिक मतांची पावती दिली आहे. कामेच जनतेला दिसत असतात. शिवसेनेने महानगराचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी नगरसेवक कल्पक कामे करीत आहेत. विरोधात असले, तरी विकासाची दिशा देण्यात ते मागे नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी  कालयेथे केले. 

सिडकोतील प्रभाग 25 मध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांच्या विकास निधीतून साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व काही कामांचे भूमिपूजन श्री. राऊत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संपर्कप्रमुख अजय चौधरी, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते. 

श्री. राऊत यांनी सावतानगर- पवननगर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल, छत्रपती संभाजीराजे व्यायामशाळा, सावतानगरमधील महालक्ष्मी मंदिराचा सभामंडप, प्रभागातील एलईडी पथदीपांचे लोकार्पण केले. कोकण भवनात होणाऱ्या वीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, रायगड चौकात शाळेसाठी इमारत, प्रभागात पेव्हर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृहाचे नूतनीकरण करणे, क्रीडासंकुलात ग्रीन जिम बसविणे, पाटीलनगर मलनिस्सारण केंद्रास बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन केले. 

श्री. चौधरी म्हणाले, ""मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद नाहीत. श्री. बडगुजर यांनी कामातून आपली ओळख निर्माण केली आहे. ती कदापि विसरता येणार नाही.'' 

बडगुजरांची खंत 
प्रास्ताविकात श्री. बडगुजर यांनी पक्षांतर्गत कुरघोडीचा समाचार घेतला. कोणीही एखादा पदाधिकारी वरिष्ठांचे कान भरतो. त्याचे दुष्पपरिणाम चांगल्या प्रमाणिक कार्यकर्त्यांना भोगावे लागतात. ते थांबले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नगरसेवक श्‍यामकुमार साबळे, दिलीप दातीर, डी. जी. सूर्यवंशी, चंद्रकांत खाडे,  नगरसेविका सत्यभामा गाडेकर, भाग्यश्री ढेमसे, कल्पना पांडे, नयना गांगुर्डे, रंजना बोराडे, किरण गामणे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, सुदाम ढेमसे, दीपक दातीर व नागरिक उपस्थित होते. शेवटी रवी शेट्टी यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. 

महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डेंसह एकही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित नव्हते. विकासकामांच्या उद्‌घाटनास महापौर शक्‍यतो राजकारण बाजूला ठेवून हजेरी लावतात. मात्र, आज त्यांचीही अनुपस्थिती पाहून आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. 

Web Title: nashik news sanjay raut shiv sena