शहरात आणखी नऊ सिग्नलची भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक - शहरातील काही मार्गांवर वाहतुकीची कोंडी आणि अपघात सतत होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नऊ ठिकाणी नव्याने सिग्नल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक सिग्नलमध्ये आणखी भर पडेल. वाहतूक शाखेत नवीन अत्याधुनिक नऊ टोइंग व्हॅनही लवकरच दाखल होणार आहेत, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. 

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त अजय देवरे यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस शाखेची बैठक झाली. तीत शहरात नव्याने सिग्नल बसविण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर प्रत्यक्ष वर्दळीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानुसार नऊ ठिकाणी नव्याने वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली. या वेळी द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासनाशी चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. 

चालकांवर दंडाचा बडगा
गेल्या महिनाभरात आयुक्तालय हद्दीत वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवून २१ हजार ६८६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून ५३ लाख ९६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात विनाहेल्मेट तीन हजार १४४ दुचाकीस्वारांकडून १५ लाख ७२ हजार रुपये, सीटबेल्ट न लावणाऱ्या चार हजार ४९८ वाहनाचालकांवर कारवाई करीत आठ लाख ९९ हजार ६०० रुपये, नो-पार्किंगमधील तीन हजार ४०७ वाहनांवर कारवाई करीत सहा लाख ८१ हजार ४०० रुपये, तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५१ चालकांवर न्यायालयातर्फे ७६ हजारांचा दंड वसूल केला आहे.