मृद व जलसंधारण आयुक्तालयासाठी क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

नवीन आकृतिबंध निश्‍चित; कृषी विभागाची 9,967 पदे वर्ग

नवीन आकृतिबंध निश्‍चित; कृषी विभागाची 9,967 पदे वर्ग
नाशिक  - मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नवीन आयुक्तालयाचा आकृतिबंध निश्‍चित करण्यात आला असून, कृषी विभागाची नऊ हजार 967 पदे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे आता उरलेल्या मनुष्यबळाच्या नवीन आकृतिबंधाची नेमकी काय स्थिती राहणार, याकडे कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमधील वाल्मी परिसरात मृद व जलसंधारण आयुक्तालय सुरू करण्यात येणार आहे. "वाल्मी' संस्थेच्या स्वायत्तेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे जलसंपदाची प्रशिक्षण संस्था वर्ग करण्यात येणार आहे. या विभागाचे कार्यक्षेत्र 250 हेक्‍टरवरून 600 हेक्‍टरपर्यंत वाढवण्यात आले आहे. कृषी विभागाकडे विस्तार कार्य, प्रशिक्षण व भेट योजना, मृदसंधारण, फलोत्पादन असे विभाग कार्यरत होते. त्या वेळी राज्यभरात 45 हजार मनुष्यबळ कार्यरत होते.

कृषी विभागाकडून नवीन मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आलेली पदसंख्या अशी - संचालक- 1, कृषी सहसंचालक- 1, अधीक्षक कृषी अधिकारी- 41, कृषी अधिकारी (वर्ग एक)- 4 व 3, वर्ग दोन- 488, लेखाधिकारी वर्ग दोन - 40, कृषी पर्यवेक्षक-मंडल अधिकारी- 2, 746, अधीक्षक - 1, सहायक लेखाधिकारी- 34, सहायक अधीक्षक - 6, कृषी सहायक - 2,042, वरिष्ठ लिपिक- 462, कनिष्ठ लिपिक - 881, टंकलेखक - 360, स्वीय सहायक - 1, उच्चश्रेणी लघुलेखक- 1, निम्नश्रेणी लघुलेखक- 1, आरेखक- 2, अनुरेखक- 1 हजार 988, वाहनचालक- 38, नाईक- 2, शिपाई- 469. याशिवाय जलसंपदा विभागाची शिपाई ते मुख्य अभियंतापर्यंतची 381 पदे मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.