अन्य बॅंकांच्या एटीएम वापरामुळे स्टेट बॅंकेला 51 कोटींचा भुर्दंड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

नाशिक - नोटाटंचाईने त्रस्त स्टेट बॅंकेच्या खातेदारांनी स्टेट बॅंकेऐवजी इतर बॅंकांच्या एटीएमचा वापर सुरू केल्याने त्याचा फटका स्टेट बॅंकेला बसला आहे. स्टेट बॅंकेच्या ग्राहकांनी इतर बॅंकांचे एटीएम वापरल्याचा मोबदला म्हणून स्टेट बॅंकेला तब्बल 51 कोटी रुपये अन्य बॅंकांना चुकवावे लागले. निर्बंधापेक्षा जास्त एटीएम वापर करण्यापोटी ग्राहकांप्रमाणे बॅंकांनाही भुर्दंड सोसावा लागतो. 

नोटाबंदीनंतर लागलीच रिझर्व्ह बॅंकेने कॅशलेस कामकाज वाढविण्यासाठी अनेक धोरणात्मक बदल केले. तीन लाखांच्या रोखीच्या मर्यादेसोबतच तीन आणि पाचपेक्षा जास्त व्यवहार एटीएमद्वारे केल्यास त्यावर शुल्क आकारणी सुरू केली. रोखीच्या व्यवहारावर मर्यादा आणण्याच्या या धोरणामुळे नोटाटंचाई सुरू झाली. दंड भरावा लागू नये म्हणून पूर्वी वारंवार एटीएममध्ये व्यवहार करणारे खातेदार आता वारंवार एटीएममध्ये जावे लागू नये म्हणून एकदाच रोख रकमा काढून घरात साठवू लागले. व्यवहारावरील कर आकारणीच्या भयाने नोटांच्या उलाढालींवर परिणाम झाला आहे. स्टेट बॅंकेची जिल्ह्यात 217 एटीएम केंद्रे आहेत. त्यांपैकी गेल्या महिन्यात 80 टक्के एटीएम केंद्रे बंद होती. सध्या 20 टक्‍क्‍यांच्या आसपास स्टेट बॅंकेचे एटीएम बंद असल्याचा बॅंकेच्या सूत्रांचा दावा आहे. 

नोटांची स्थिती सुधारत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत एटीएमची स्थिती सुधारली आहे. स्टेट बॅंकेची 80 टक्‍क्‍यांवर एटीएम सुरू आहेत. एटीएमचा वापर करण्यावर मर्यादा आहेत. त्या ग्राहकांप्रमाणे बॅंकांसाठीही लागू आहे. निर्बंधाचे शुल्क ग्राहकांप्रमाणे बॅंकांनाही चुकवावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाबाबत सहकार्य करावे. 
-सुधीर भागवत, विभागीय महाव्यवस्थापक, स्टेट बॅंक