डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

55 टक्‍के जागा अद्यापही रिक्‍त; 32 हजार 230 जागांसाठी अवघे 14 हजार 397 अर्ज

55 टक्‍के जागा अद्यापही रिक्‍त; 32 हजार 230 जागांसाठी अवघे 14 हजार 397 अर्ज
नाशिक - दहावीनंतर डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रमाची प्रक्रिया सध्या सुरू असून, तंत्रशिक्षण संचालनालयाने अल्प प्रतिसादानंतर अर्जाची मुदत 4 जुलैपर्यंत वाढवूनही चित्र निराशाजनकच आहे. नाशिक विभागात 32 हजार 230 जागांसाठी 14 हजार 397 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निश्‍चित केले आहेत. त्यामुळे 17 हजार 833 अर्थात, 55 टक्‍के जागा रिक्‍त राहण्याची भीती आहे.

काही वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठीचा विद्यार्थ्यांचा डिप्लोमासाठी प्रतिसाद घटत आहे. दहावीच्या निकालानंतर 19 जूनपासून डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली होती. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची किट खरेदी, ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणीसह अर्ज कन्फर्मेशन करण्यासाठी 30 जूनची मुदत होती. नंतर या मुदतीत वाढ करण्यात आली होती. नाशिक विभागातून खुल्या गटासाठी चार हजार 876 किट, तर विविध राखीव प्रवर्गांसाठीच्या 11 हजार 299 किट अशा एकूण 16 हजार 175 किटची विक्री सुविधा केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यापैकी 14 हजार 397 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कन्फर्मेशन केले.

वाढीव मुदतीत अर्ज करणारे अंतिम यादीत
नियोजित वेळापत्रकानुसार 1 जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. 2 ते 4 जुलै या कालावधीत यादीसंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या. यादरम्यान 4 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. या वाढीव मुदतीत अर्ज कन्फर्मेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश अंतिम गुणवत्ता यादीत करण्यात आला आहे.