दुचाकीस्वारांना आठ लाखांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नाशिक - वाहतूक पोलिस शाखेने पोलिस ठाण्यांच्या मदतीने आज शहरभर मेगा नाकाबंदी करून तब्बल ३० हजार वाहनांची तपासणी केली; तर दोन हजार वाहनांवर कारवाई केली. हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आठ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट असूनही न वापरणाऱ्यांकडून १०१ वेळा ‘हेल्मेट डोक्‍यात घालण्यासाठी असते’, असे लिहून घेतले.  

नाशिक - वाहतूक पोलिस शाखेने पोलिस ठाण्यांच्या मदतीने आज शहरभर मेगा नाकाबंदी करून तब्बल ३० हजार वाहनांची तपासणी केली; तर दोन हजार वाहनांवर कारवाई केली. हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आठ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट असूनही न वापरणाऱ्यांकडून १०१ वेळा ‘हेल्मेट डोक्‍यात घालण्यासाठी असते’, असे लिहून घेतले.  

दिवसभर एकाचवेळी राबविलेल्या मोहिमेत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह २७० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्या मदतीला पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, प्रशासनाच्या उपायुक्त माधुरी कांगणे, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे रस्त्यावर उतरले होते. 

मुंबई नाका, त्र्यंबक नाका, सीबीएस, मायको सर्कल, आयटीआय सिग्नल, पपया नर्सरी, अंबड, पाथर्डी फाटा, द्वारका, पंचवटी, आडगाव नाका, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका, जेहान सर्कल, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, महात्मानगर, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, कामटवाडे यांसह पोलिस ठाण्यांतर्गत नाकाबंदी करून दिवसभरात सुमारे ३० हजार दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांच्या कागदपत्रांची पाहणी केली. चालकांकडील वाहन परवान्याची शहानिशा केली. हेल्मेट न घातलेल्या दुचाकीचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट असूनही न घालणाऱ्या दुचाकीचालकांकडून ‘हेल्मेट डोक्‍यात घालण्यासाठी असते,’ असे १०१ वेळा लिहून घेतले. त्यामुळे एकप्रकारे हेल्मेट वापराची जनजागृतीही केली. 

कारवाईत रिक्षातील अवैध प्रवासी वाहतूक, नियमांचे पालन, दुचाकींची तपासणी, अवजड वाहनांची कागदपत्रे यांसह फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांचा समावेश होता. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमर लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त अजय देवरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

वाहनांची तपासणी : ३० हजार
वाहनावर कारवाई : दोन हजार ७१२
दंडाची वसुली : आठ लाख रुपये
नाकाबंदी : ५२ ठिकाणी
बंदोबस्त (पोलिस ठाणे) : ६० अधिकारी, २५० कर्मचारी 
बंदोबस्त (वाहतूक शाखा) : १० अधिकारी, २७० कर्मचारी