यात्रोत्सवात चिमुरड्यांसह ज्येष्ठांचाही जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - ग्रामदैवत श्री कालिका यात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. दर्शनाबरोबरच विविध खेळण्यांचा आनंद आज बच्चेकंपनीसह ज्येष्ठांनीही घेतला. यात्रेमुळे येथील अर्थकारणासही गती मिळाली आहे. तत्पूर्वी आज सकाळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सपत्नीक महाआरती केली. 

ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात पाचव्या माळेला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी झालेल्या आरतीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सपत्नीक कालिकादेवीचा अभिषेक करून आरती केली. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार आणि शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनीदेखील देवीची आरती केली. 

देवी मंदिरात मंत्रोच्चारात देवीची पूजा बांधण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रसिद्ध सनईवादकांनी मंजूळ सुरात देवीची स्तुती केली. सकाळी महिला भजनी मंडळाने देवीचे पाठ म्हणून संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. यात्रोत्सवानिमित्त विविध खाद्यपदार्थांसह पाळण्यांना बच्चेकंपनीची मोठी पसंती होती. पोलिस व महापालिकेने मज्जाव करूनही परिसरात मोठ्या प्रमाणावर खेळणी तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर लागले आहेत. 

मुखदर्शनासाठीही होतेय गर्दी 
यात्रोत्सवकाळात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. ज्यांच्याकडे वेळ आहे, ते रांगेत उभे राहून दर्शन घेतात, परंतु अनेकांकडे दर्शनासाठी पुरेसा वेळ नसतो, अशा भाविकांसाठी मंदिराच्या बाहेरूनच कालिकामातेचे मुखदर्शन घेण्याची सुविधा आहे. काल व परवा सुट्यांमुळे मोठी गर्दी झाल्याने अनेकांनी मुखदर्शन घेण्यासच प्राध्यान्य दिले. आजही मुखदर्शनासाठी गर्दी होती. मुखदर्शनासाठी या ठिकाणी छोटा चौथरा उभारावा, अशी भाविकांची मागणी आहे.

Web Title: nashik news yatra shri kalika devi