'महिला संरक्षण कायद्यात जनजागृतीची गरज'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नाशिक -महिलांवरील हिंसाचार व अत्याचार कमी करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. महिला आयोग जिल्हा, तालुका पातळीवर जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांतर्फे घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले. 

नाशिक -महिलांवरील हिंसाचार व अत्याचार कमी करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. महिला आयोग जिल्हा, तालुका पातळीवर जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांतर्फे घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले. 

राज्य महिला आयोग व जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण' या विषयावर रोटरी क्‍लब सभागृहात कार्यशाळा झाली. त्या वेळी ठाकरे बोलत होत्या. महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त बी. टी. पोखरकर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव वरिष्ठ न्यायाधीश विवेककुमार अग्रवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख आदी उपस्थित होते. 

महिलांवर होणारा अत्याचार दूर करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करून श्रीमती ठाकरे म्हणाल्या, की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याविषयीच्या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. आयोगातर्फे आगामी काळात सायबर सिक्‍युरिटी व कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसाचारापासून बचाव या विषयांवर कार्यशाळा होणार आहे. 

श्री. अग्रवाल म्हणाले, की पती-पत्नीचे नाते विश्‍वास व प्रेमानेच टिकवावे. तसे करण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याची वेळ येऊ देऊ नये. महिला सबलीकरणासाठी आणि महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांना समुपदेशनाद्वारे मदत व सल्ला देताना दाखलपूर्व मदत व सल्ला अशी पद्धत अवलंबवावी, असे मत त्यांनी मांडले. अत्याचारांपासून महिलांचे संरक्षण करण्यास शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. महिला संरक्षण कायद्यामुळे महिलांना न्याय मिळाला आहे. त्याची माहिती सर्व महिलांनी करून घ्यावी, असे श्री. पोखरकर यांनी सांगितले. श्री. राऊत यांनी प्रास्ताविकात कायद्याची माहिती देतानाच जनजागृती हा कार्यशाळेचा उद्देश सांगितला. प्राजक्ता मजलिस यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम व त्यातील पैलूंची माहिती दिली. 

Web Title: Need for awareness among women protection laws