शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी श्रीलंकेचा नागरिक गजाआड

शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी श्रीलंकेचा नागरिक गजाआड

नाशिक : नाशिक शहरासह जिल्हा व लगतच्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल पाऊण कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यास मदुराईच्या (तामिळनाडू) विमानतळावर अटक करण्यात आली आहे. नाशिक आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हेशाखेने संशयित व्यापारी ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) यास तामिळनाडू पोलिसांकडून ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.20) पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणी गेल्या वर्षी आडगाव पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. संशयित विजयकुमार चंद्रशेखर (रा. सेलम, तामिळनाडू), ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) यांनी संगनमत करून साई पादुका एक्‍सपोर्ट या नावे फर्म स्थापन केली होती. या फर्ममध्ये संशयित ससिरण नागराज हा भागीदार नसतानाही त्यास भागीदार दाखविण्यात आले होते. या दोघा संशयितांनी नाशिक शहरासह जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यतील शेतकऱ्यांकडून कांदा व ज्युट पोती खरेदी करून त्यांची तब्बल 74 लाख 14 हजार 681 रुपयांची फसवणूक केली होती. ससिगरण नागराज याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे पैसे न देताच श्रीलंकेत पळून गेला होता.

सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त भागवत सोनवणे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी लुकआऊट नोटीस बजावली होती. त्यानुसार देशभरातील साऱ्या विमानतळांवर संशयित नागराजची माहिती दिली गेली होती. त्याचप्रमाणे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सातत्याने तामिळनाडू पोलीसांच्या संपर्कात होते. 

दरम्यान, गेल्या गेल्या शनिवारी (ता.14) संशयित ससिगरण नागराज तामिळनाडूतील मदुराई विमानतळावर उतरणार असल्याची माहिती मिळताच मदुराई पोलिसांच्या मदतीने त्यास विमानतळावरच अटक करण्यात आली. संशयित अटक झाल्याचे कळताच नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवाजी काकड, व पथक मदुराईला गेले आणि संशयित नागराज यास पेरीगुडी पोलीस ठाण्याच्या ताब्यातून अटक केली. त्यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, येत्या शुक्रवारपर्यंत (ता.20) पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयितांनी 12 लाख 75 हजार रुपयांची रक्कम फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना परतही केली आहे. 

नाशिक, नगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी संशयितांनी फसवणूक केली आहे, त्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी तात्काळ नाशिक पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधून तक्रार द्यावी. 
- रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com