भरवशाच्या कांद्याने वर्षभरात केला 122 कोटींचा वांदा

संतोष विंचू
मंगळवार, 9 मे 2017

आकडे बोलतात...
* लागवड : पोळ - 6,627, रांगडा - 8,705, उन्हाळ - 9,738 हेक्‍टर
* वर्षभरात विक्री : 30 लाख 71 हजार क्विंटल
* बाजारभाव : 200 ते एक हजार 162 रुपये (सरासरी 600 रुपये)
* शेतकऱ्यांचा तोटा : 122 कोटी 85 लाख
* 2015-16 मधील विक्रीमूल्य : 240 कोटी
* नोव्हेंबर ते मार्चदरम्यान विक्री : 21 लाख 11 हजार क्विंटल
* सर्वाधिक आवक : जानेवारी व फेब्रुवारी- 15 लाख 18 हजार
* अपेक्षित बाजारभाव : एक हजार रुपये प्रतिक्विंटल.

येवला : गेल्या वर्षभरात तिन्ही हंगामांत पाऊस व वातावरणाचा मेळ बसल्याने शेतकऱ्यांनी विक्रमी क्षेत्रावर कांदा लावला; पण अपेक्षित भाव न मिळाल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. मार्चअखेरपर्यंत येथील बाजार समितीत वर्षभरात तब्बल 30 लाख 71 हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्री केला. मात्र, उत्पादन खर्च व नफा विचारात घेता शेतकऱ्यांना जवळपास 122 कोटी 85 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.

उत्पादन व भावाचे गणित जुळल्यास हाच कांदा शेतकऱ्यांना मालामाल करतो. त्यामुळे कांद्याचे क्षेत्र घटण्याऐवजी वाढतच असते. लासलगाव, पिंपळगावपाठोपाठ येवल्याला कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी अनेक पिकांचे पर्याय मिळाले असले, तरी कांदापीक मात्र बेभरवशाचे असूनही विश्‍वासाचे वाटते. तालुक्‍यातील प्रत्येक शेतकरी कमी-अधिक प्रमाणात कांदालागवड करतोच. 2015-16 मध्ये अल्प पावसामुळे कांदालागवड घटली अन्‌ बाजारभाव हजाराच्या आसपास टिकून राहिले. त्यामुळे 2016- 17 मध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा आपला मोर्चा कांद्याकडे वळविला. त्यातच पावसानेही साथ दिली. वातावरणही पोषक राहिल्याने पीक जोमात आले, पण भावाने मात्र दगाबाजी केली.

25 हजार हेक्‍टरवर होते लागवड..!
तालुका अवर्षणप्रवण असल्याने खरिपातील पोळ व रब्बीतील रांगडा कांद्याची मुखत्वे लागवड केली जाते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत सुमारे 15 हजार हेक्‍टरपर्यंत, तर पाणीटंचाईमुळे उन्हाळ कांद्याची नऊ हजार हेक्‍टरपर्यंत लागवड केली जाते. पावसाने दमदार एंट्री केल्याने यंदा लाल, पोळ व पाठोपाठ रांगड्या कांद्याचे क्षेत्र विक्रमी वाढले. बाजार समितीत मावणार नाही, इतका कांदा विक्रीला येत असे. दिवाळीनंतर कांदा निघू लागल्याने नोव्हेंबरमध्ये येवला व अंदरसूल बाजारात 46 हजार क्विंटल आवक झाली. डिसेंबरमध्ये हीच आवक दोन लाख 83 हजार क्विंटल झाली अन्‌ पुढील दोन महिन्यांत आवकेने विक्रम केला. जानेवारीत सात लाख 65 हजार, फेब्रुवारीत सात लाख 52 हजार, तर मार्चमध्ये चार लाख नऊ हजार क्विंटल आवक झाली.

उत्पादन वाढले; उत्पन्न घटले
दुष्काळ असल्याने 2015-16 मध्ये तालुक्‍यात 20 लाख 12 हजार क्विंटल कांदा विक्रीतून शेतकऱ्यांच्या हातात 240 कोटी रुपये मिळाले होते. भावात चढ-उतार होऊनही त्या वेळी सरासरी एक हजार 150 रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा मात्र लागवड वाढल्याने येवल्यात 20 लाख 47 हजार, तर अंदरसूलला दहा लाख 23 हजार असा 30 लाख 71 हजार क्विंटल कांदा विक्री झाला आहे. वर्षभरात या कांद्याला 200 ते एक हजार 162 रुपये, तर सरासरी सहाशे रुपये भाव मिळून 184 कोटी 27 लाख रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडले. वास्तविक उत्पादन खर्च पाहता सरासरी एक हजाराचा भाव कांद्याला मिळणे अपेक्षित होते. एवढा भाव मिळाला असता, तर तब्बल 307 कोटी रुपये मिळून खर्च व नफा असा ताळमेळ बसला असता. पण, भाव घसरलेले असल्याने 122 कोटींचा तोटा सहन करावा लागलाय.

पावसाने चांगली सुरवात केल्याने तिन्ही हंगामांत कांदालागवड वाढली. पोषक वातावरणामुळे उत्पादनही चांगले निघाले. मात्र, निर्यातीला अपेक्षित चालना मिळू शकली नाही. त्यातच नोटाबंदी, विक्रमी आवक, इतर राज्यांतही वाढलेले उत्पादन आदी कारणांमुळे भाव घटत गेले. वास्तविक प्रतिक्विंटल सरासरी एक हजार रुपये भाव मिळायला हवा होता. तरच हे पीक परवडले असते.
- डी. सी. खैरनार, सचिव, कृउबा, येवला

Web Title: onion market brings loss of 122 crore to farmers