जळगाव जिल्ह्यातील टंचाई मिटण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने बहुतांश गावांतील पाणीटंचाई मिटली आहे. यामुळे टॅंकरसंख्या बोटावर मोजण्याएवढी शिल्लक आहे. लवकरच तेही बंद होतील. प्रत्येक गावाने ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ ही मोहीम राबवावी.
- राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव

टॅंकरसंख्या १०८ वरून आठवर; लवकरच तेही होणार बंद
जळगाव - भीषण दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देत सर्वत्र समाधानकारक हजेरी लावणाऱ्या पावसाने चारच दिवसांत जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटविली आहे. यंदाच्या हंगामात शंभरावर गेलेली टॅंकरसंख्या आता आठवर आली असून, दोन-चार दिवसांत हे टॅंकरही बंद होतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, आज सलग चौथ्या दिवशी जळगाव शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला.

जळगाव शहरासह जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवली. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना केल्या. यंदा जिल्ह्यात टॅंकरसंख्या १०८ वर, तर टॅंकरग्रस्त गावे १२३ वर पोहोचली होती. जामनेर तालुक्‍यात सर्वाधिक टॅंकर सुरू होते, तर त्याखालोखाल पारोळा, अमळनेर तालुका होता. जून सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने सुरू असलेल्या टॅंकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली गेली. यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे टॅंकरसंख्या केवळ ८ वर आली आहे.

पावसाची उघडीप
तब्बल चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज काही तास विश्रांती घेतल्याने नागरिकांना दैनंदिन कामे करता आली. शनिवार, रविवार व सोमवार तीनही दिवस पावसाची रिपरिप सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नव्हते. काल सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्यावरही अनेकांना महत्त्वाची कामे करता आली नाहीत. आज मात्र दुपारपासून पावसाने विश्रांती दिल्याने नागरिकांनी बाजारपेठ, व्यापारी संकुले, शासकीय कार्यालये, बॅंकांमध्ये गर्दी केली.

तीन तालुक्‍यांत अतिवृष्टी
जिल्ह्यात मुक्ताईनगरला ९०.० मिलिमीटर, बोदवड- ७०, तर रावेरला ७९.९ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी सकाळी आठपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) असा -
जळगाव-३९.९
जामनेर-३५.३
एरंडोल- १३.३
धरणगाव- ३४
भुसावळ- ५८,७
यावल ५२.५
रावेर- ७९.९
मुक्‍ताईनगर- ९०.८
बोदवड- ७०
पाचोरा- २०.४
चाळीसगाव-१७.९
भडगाव-१९
अमळनेर-२५.८
पारोळा-१४.४, 
चोपडा- ४६

धरणांतील आजचा पाणीसाठा (द.ल.घ.मी.)
हतनूर    ६५
वाघूर    ०
गिरणा    १२१.१९
मन्याड    ०
बोरी    ०
भोकरबारी    ०
सुकी    ३१.८०
अभोरा    ३.१४
अग्नावती    ०
तोंडापूर    ३.१२
हिवरा    ०
मंगरूळ    ६
बहुळा    ०
मोर    ३.६४
गूळ    ०
अंजनी    ०

Web Title: over scarcity in Jalgaon district on the way