दारू दुकानाविरोधात महिलांचा ‘थाळीनाद’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

परिसरातील महिला, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा, हॉस्पिटल व सभागृहावर या दुकानामुळे विपरीत परिणाम होणार आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करून न्याय द्यावा. दारू दुकान तत्काळ बंद करावे. दुकान हटविल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
- महंत दीपनंद सरस्वती, रहिवासी, महादेव पार्क सोसायटी

आरटीओ कॉर्नरला मुलाबाळांसह तेरा तास ठिय्या 

पंचवटी - दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरातील भवानी पॅलेसमधील अमित वाइन शॉप बंद करावे, यासाठी येथील महिलांनी मुलाबाळांसह तब्बल तेरा तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या (ता. १७) सकाळी अकराला म्हसरूळ पोलिस ठाण्यात संबंधितांची बैठक बोलविली आहे.

दिंडोरी रोडवरील भवानी पॅलेस या इमारतीत अमित वाइन शॉप हे मद्याचे दुकान आहे. हे दुकान न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गाच्या कक्षेत येत असल्याने ते तातडीने बंद करावे, यासाठी महिलांनी भाजपच्या शहर उपाध्यक्षा मंगला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल (ता. १५) तीव्र आंदोलन करत दुकान बंद पाडले. आज सकाळी संबंधित दुकानाचा व्यवस्थापक दुकान उघडण्यास आला असता महिलांनी मुलाबाळांसह आंदोलन छेडत दुकान उघडण्यास मज्जाव केला. त्या वेळी हमरीतुमरी झाल्यावर काही महिलांच्या बांगड्याही फुटल्या. हे प्रकरण पोलिसांत गेल्यावर मोठ्या संख्येने पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

या भागात नागरी वस्ती असून, शाळकरी मुलांसह अन्य मुले या दुकानात दारू घेण्यासाठी येतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. दुकानामुळे येथील गुंडगिरी वाढत असून, पार्किंगचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. याबाबत उद्या सकाळी अकराला म्हसरूळ पोलिस ठाण्यात संबंधितांची बैठक बोलविल्याची माहिती मंगला शिंदे यांनी दिली. बैठकीत काहीही तोडगा निघाला तरी हे दुकान चालू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आजच्या आंदोलनात सौ. शिंदे यांच्यासह मंगला बागूल, लता मोरे, संगीता पाटील, ज्योती पाटील, अनिता भामरे, पूर्वा देशमुख, संगीता देशमुख, जयश्री माळगावे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रविशंकर मार्गावरही महिलांचे ठाण

डीजीपीनगर  - रविशंकर मार्गावरील महादेव पार्क सोसायटीच्या तळमजल्यावर सुरू झालेले महाराणी वाइन शॉप तत्काळ बंद करण्यासाठी सोसायटी आणि परिसरातील महिलांनी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. महिला लेकराबाळांसोबत ठाण मांडून बसल्या आहेत.

दुकानमालकाने आज नोकराद्वारे दुकान उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस बंदोबस्तात महिलांनी हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत  रहिवाशांनी उपनगर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही संबंधितांनी दखल घेतली जात नसल्याने त्र्यंबकेश्‍वरचे महंत बिंदू महाराज, स्वामी सागरानंद महाराज, महंत, आमदार, नगरसेवकांसमवेत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, दुकान हटविण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. दुकान त्वरित बंद करावे, अशी मागणी महंत दीपानंद सरस्वती, शीला जाधव, शीतल अडांगळे, मटिल्डा डिसूजा, वैशाली दारूळ, सरिता चौरे, पूजा जगताप, नीलम पगारे, मेघा थूल, ज्योती चंदवानी यांनी केली आहे.