मोसम नदीतील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने ग्रामस्थांचे आंदोलन

दीपक खैरनार
रविवार, 20 मे 2018

अंबासन, (नाशिक)  : औरंगाबाद-अहवा मार्गावरील खामलोण फाट्यावर मोसम नदीपात्रातील ब्रिटिश कालीन बंधाऱ्यावरील लाकडी फळ्या पाटबंधारे विभागाने काढून टाकल्या. या विरोधात परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. याची दखल घेत, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता राजेंद्र सुर्यवंशी यांनी काढलेल्या फळ्या पुर्ववत लावण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी सात वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

अंबासन, (नाशिक)  : औरंगाबाद-अहवा मार्गावरील खामलोण फाट्यावर मोसम नदीपात्रातील ब्रिटिश कालीन बंधाऱ्यावरील लाकडी फळ्या पाटबंधारे विभागाने काढून टाकल्या. या विरोधात परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी रस्त्यावर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. याची दखल घेत, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता राजेंद्र सुर्यवंशी यांनी काढलेल्या फळ्या पुर्ववत लावण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी सात वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

 एकीकडे सटाणा तालुक्यातील अनेक गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना, येथील ग्रामस्थांनी एकजूट होऊन मोसम नदीपात्रात लाखो ब्रास वाळूची साठवण केली आहे. यामुळे या परिसरातील शेतीसिंचन व गावाला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने हेतूपुरस्सर नामपुर जवळील ब्रिटीशकालीन बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने हजारो ब्रास वाळू हरणबारी धरणातून सोडलेल्या आवर्तनातुन वाहून जाईल. नामपुर बंधाऱ्याखाली रात्री अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असून, संबंधित विभागाकडून वाळुमाफियांना पाठबळ देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरील फळ्या काढल्या आहेत. असे, राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले. द्याने, उत्राणे, खामलोण, राजपुरपाडे, वागळे, आसखेडा येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत द्याने गावचे माजी उपसरपंच मधूकर कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली खामलोण फाट्यावर चार वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस प्रशासनाने दखल घेऊन बंदोबस्त वाढविला होता. जोपर्यंत उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सुर्यवंशी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला होता. अखेरीस तीन तासानंतर पाटबंधारे विभागाला पाझर फुटला व सुर्यवंशी उपस्थित झाले. यावेळी आंदोलक आक्रमक होऊन सुर्यवंशी यांना घेराव घालत फळ्या काढण्यामागचे कारण काय, साठवलेली वाळू वाहून जावी व मुजोर वाळुमाफियांना फायदा व्हावा यामागचा हेतु तर नाही ना अशा प्रश्नांचा भाडीमार करीत सुर्यवंशी यांना घाम फोडला होता. अखेरीस वरिष्ठांना फोनाफोनी करून एक फळी सोडून अन्य फळ्या पुर्ववत लावण्याचे आश्वासन दिले. द्याने गावाने लाखो ब्रास वाळू साठवण केली आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने कौतुकाची थाप देण्याऐवजी वाळुमाफियांना प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. यावेळी आंदोलनात मधुकर कापडणीस, रावसाहेब कापडणीस, बाळा कापडणीस, संदीप कापडणीस, गोपाळ कापडणीस, कमलाकर कापडणीस, दीपक पगार, कारभारी पगार, राहुल पगार, अभिमन पगार, संजय कापडणीस, दगा कापडणीस, भूषण कापडणीस, शैलेंद्र कापडणीस, शरद कापडणीस, पंकज कापडणीस, गुलाबराव कापडणीस व द्याने, आसखेडा, वाघळे, उत्राने, खामलोन, राजपुरपांडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: people protest against irrigation department