आता दर रविवारी पेट्रोलपंप राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सप्टेंबर 2013 ला पेट्रोलियम मंत्रालयाने ऑइल कंपन्यांना समितीचा अहवाल अमलात आणण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष केले. अद्यापपर्यंतही अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही

जळगाव - पेट्रोलपंप चालकांना दिवसेंदिवस पंप चालविणे कठीण झाले आहे. शासनमान्य ऑइल कंपन्यांनी अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालाची (2011) अंमलबजावणी न केल्याने जळगावसह राज्य व देशभरातील पेट्रोलपंप चालक उद्या (ता. 10) पेट्रोलची खरेदी बंद ठेवणार आहेत; तर येत्या 14 मेपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवतील व 15 मेपासून फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

असोसिएशनचे उपाध्यक्ष रामेश्‍वर जाखेटे, सचिव रितेश मल्हारा, माजी अध्यक्ष प्रदीप साठे यावेळी उपस्थित होते.

श्री. चौबे यांनी सांगितले, की पूर्वी शासनाकडून पेट्रोलपंप चालकांना कमिशन दिले जात होते. 2010 पासून पेट्रोलियम मंत्रालयाकडून अपूर्व चंद्रा समितीची नेमणूक झाली. या समितीने पंप चालकांना कमिशन कसे असावे, ऑपरेटिंग खर्च कसा असावा, इतर खर्च कसा असावा याबाबत अहवाल दिला होता. तो अहवाल शासनाने 2012 ला स्वीकारला. मात्र, त्याची अंमलबजावणी पेट्रोलियम कंपन्यांनी न केल्याने एक व दोन ऑक्‍टोबर 2012 ला पंप चालकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी ऑइल कंपन्यांनी अत्यल्प मार्जिन वाढविले. सप्टेंबर 2013 ला पेट्रोलियम मंत्रालयाने ऑइल कंपन्यांना समितीचा अहवाल अमलात आणण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष केले. अद्यापपर्यंतही अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही.

यामुळे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या (फामपेडा) आधिपत्याखाली देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी एकत्र येऊन येत्या 10 मेस पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा तसेच 15 मेपासून एकाच शिफ्टमध्ये पेट्रोलपंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय 14 मेच्या रविवारपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद राहतील. यामुळे पेट्रोलपंप चालकांच्या खर्चात कपात होऊन होणारे नुकसान टाळता येणार आहे.

ग्राहकांना त्रास नाही
येत्या 10 मेस पेट्रोल, डिझेलची खरेदी आम्ही करणार नाही, मात्र पंप सुरू राहतील. ग्राहकांना इंधनाचा तुटवडा पडू देणार नाही. इतर दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतच इंधन मिळेल. रविवारी मात्र पंप बंद राहतील. त्यादृष्टीने ग्राहकांना दक्ष राहावे लागेल.

पेट्रोलपंप संख्या
जळगाव शहर ः 20
जिल्ह्यात ः 195
राज्यात ः 4 हजार 500
देशात ः 55 हजार

Web Title: Petrol pump to remain closed