तहानलेल्या घशांना पोलिसांची ओंजळ

दीपक खैरनार
रविवार, 27 मे 2018

दोधनपाडा (ता.बागलाण) येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या पाड्यावर कुठलीही रस्त्याची सोय नाही. याबाबत 'दै. सकाळ' ने गुरूवारी (ता.२४) रोजी 'एकाच झ-यावर तीनशे लोकांची तहान' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी या वृत्ताची दखल घेत दोधनपाडा गाठले आणि ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.

नाशिक - दोधनपाडा (ता.बागलाण) येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या पाड्यावर कुठलीही रस्त्याची सोय नाही. याबाबत 'दै. सकाळ' ने गुरूवारी (ता.२४) रोजी 'एकाच झ-यावर तीनशे लोकांची तहान' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी या वृत्ताची दखल घेत दोधनपाडा गाठले आणि ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.

भीषण पाणीटंचाईची दाहकता पाहता जायखेडा पोलिसांच्या सहकार्याने पाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर पोहोचवले आहेत. पोलिस आले की, अनेक विचार मनात येतात. दोधनपाड्यात अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी दोधनपाड्यात पोहचले आणि नागरिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या पाड्यावर अतिशय दुषित पाण्याच्या एका छोट्याश्या झ-यावर काही महिलांनी गर्दी केली होती. एका महिलेने सांगितले की, या पाड्यावर चार पिढ्या खपल्या परंतु, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, रस्ते नाहीत शिवाय आजही वीज पोहचली नसल्याने रॉकेलवर दिवे जळत आहेत. 

आरोग्याची समस्या अतिशय बिकट असल्याचे बोलले जाते. या पाड्यावर कधीही आरोग्य यंत्रणा पोहचली नसून रूग्णांना डोलीच्या सहाय्याने तब्बल चार ते पाच किलोमीटर घेऊन जावे लागते. पाच ते सहा महिलांना वेळेवर उपचार होऊ शकले नसल्याने अर्ध्या रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ही सर्व हकीकत सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गावित ऐकून थक्क झाले. त्यांनी कर्मचा-यांना सुचना देऊन पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर पहायला सांगितले, मात्र रस्ताच नसल्याने कोणीही तयार होत नव्हते. अखेरीस खालचे टेंभे येथील एकाने धाडस दाखवले. रस्त्याची पाहणी केली. ज्या पायवाटेने जाणे मुश्किल आहे. तेथून थेट पाण्याने भरलेला टँकर घेऊन जाणे फारच जिकिरीचे वाटतं होते. पोलिसांनी व स्थानिक रहिवाशांनी टिकाव, फावडे व घमेले घेऊन तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला. दुस-या दिवशी सकाळी दहा वाजेपासून पोलिसांनी व ग्रामस्थांनी बिलपुरीहून टँकर डोंगराच्या पायथ्याशी आणले. दोधनपाड्यातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी एकच गर्दी केली. दोधनपाड्यात टॅकर आल्याने पोलिस व ग्रामस्थांनी दै.'सकाळ'चे आभार मानले.

दै.सकाळ च्या बातमीची दखल घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली. दोधनपाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. टँकर जाण्यासाठी रस्ता नव्हता स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने रस्ता करून मोठ्या जिकिरीने टॅकर पोहोचवले असे गावित यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पाण्याचे टॅकर घेऊन जाताना दोन ते तीन ठिकाणी पलटी होता-होता वाचले. ग्रामस्थांनी व पोलिसांनी मोठी मदत केल्याने पाण्याने भरलेला टॅकर घेऊन जाणे शक्य झाले टँकर ड्रायव्हर कृष्णा मोरे याने सांगितले.

Web Title: police supply water tanker for dodhanpada