फसवणूक प्रकरणातील आरोपीचा मालमत्ता विक्रीचा प्रस्ताव सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नाशिक - जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी "हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'चा मुख्य संचालक विनोद पाटील याची सुमारे 27 कोटींची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. या मालमत्तेच्या विक्रीसंदर्भातील प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

"हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट' कंपनीच्या माध्यमातून मुख्य संचालक व संशयित विनोद पाटील याने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वाशे कोटींना गंडा घातला आहे. दीड महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास मुंबईतून अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पाटील याच्या मालकीचे तीन फ्लॅट, एक रो-हाऊस, दोन व्यावसायिक गाळे, दोन शेतजमिनी, दिंडोरी रोडवरील वर्ल्ड ट्रेड सेंटर व डायमंड पार्क इमारतीसह व्यावसायिक जागा अशी सुमारे 27 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत सुमारे 900 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. याशिवाय काही कागदपत्रे व पुरावे हे सीडी स्वरूपातही दिले आहेत. तसेच स्थावर मालमत्ता विक्रीसंदर्भात पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला असून, मंजुरी मिळताच विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे. विक्रीतून उभ्या राहणाऱ्या रकमेतून गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाणार आहेत. संशयित विनोद पाटीलसह त्याची पत्नी व संचालक नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

विनोद पाटील याच्या 27 कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्ता विक्रीचा एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर मालमत्तेची विक्री करता येऊ शकेल.
- राजू मोरे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा