विषमता नष्ट होण्यासाठी आरक्षण गरजेचेच - अनिल वैद्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सर्वप्रथम महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर आरक्षणाची मागणी केली होती. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण लागू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच तरतूद केली. त्याची फळे आज चाखत आहोत.

नाशिक - अनुसूचित जातीची प्रगती होऊ लागली, की आरक्षणाला विरोध वाढू लागतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे; मात्र विषमता नष्ट होईपर्यंत आरक्षण टिकले पाहिजे. त्यामुळे हक्कांवर गदा येताच समाजबांधवांनी जागरूक राहून तो विरोध परतावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांनी आज येथे केले. 

राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे आज गुणवंत शिक्षक व राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओनिर्मिती पुरस्कार वितरण सोहळा न्या. वैद्य यांच्या हस्ते झाला. त्या वेळी "सरकारी क्षेत्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची गुणवत्ता व आरक्षणामागील घटनाकारांची 
भूमिका' यावर ते बोलत होते. सहायक आयुक्त प्रकाश आंधळे, डी. डी. सूर्यवंशी, धनंजय तेलंग प्रमुख पाहुणे होते. 

न्या. वैद्य म्हणाले, की सर्वप्रथम महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर आरक्षणाची मागणी केली होती. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण लागू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच तरतूद केली. त्याची फळे आज चाखत आहोत. ज्या समाजाला प्रगतीची संधी मिळाली नाही, त्यांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षण विषमता नष्ट होईपर्यंत असले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. आरक्षणामुळे ही प्रगती दिसत आहे; मात्र अजूनही काही खात्यांत आरक्षण नाही. त्यामुळे समाजबांधवांनी जागरूक राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आंधळे म्हणाले, की गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी पालकाची भूमिका निभावली पाहिजे, तरच ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.