नियमांत धावणाऱ्या २५ रिक्षांना लावले स्टीकर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

हेल्मेट, सीटबेल्टसक्तीतून तीन लाखांचा दंड वसूल
जळगाव - पोलिस मुख्यालय परिसरातील मंगलम्‌ सभागृहात झालेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात केलेल्या सूचनेनुसार मंगळवारी (ता. ७) कागदपत्रे पूर्ण असलेल्या व नियमांत धावणाऱ्या २५ रिक्षांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते विशेष स्टीकर लावण्यात आले. दरम्यान, १७ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट व सीटबेल्टसक्ती मोहिमेत १९ दिवसांत दोन लाख ९८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कागदपत्रे पूर्ण, परवाना आणि इतर आवश्‍यक दस्तऐवजांची पूर्तता करून नियमांत प्रवासी रिक्षांवर मंगळवारी पोलिस अधीक्षकांतर्फे प्रतीकात्मक स्टीकर लावण्यात आले. यावेळी वीर सावरकर रिक्षा युनियनचे पदाधिकारी- सदस्यांसह रिक्षाचालक, तसेच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गाढे- पाटील, उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी मेळाव्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे मंगळवारी सकाळपासूनच ५० रिक्षाचालकांनी स्वतः शहर वाहतूक कार्यालयात येऊन रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून घेतली. 

वाहतूक विभागातर्फे रिक्षांना लावण्यात येणाऱ्या विशेष स्टीकरमुळे कागदपत्रे पूर्ण नसलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी रिक्षाचालकांनी कागदपत्रे पूर्ण ठेवून त्यांची शहर वाहतूक शाखेत येऊन तपासणी करावी आणि स्टीकर लावून घ्यावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

हजारावर वाहनचालकांवर कारवाई
जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये १७ मार्चपासून हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती करण्यात आली आहे. 
या मोहिमेंतर्गत १७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान वाहतूक शाखेतर्फे हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणाऱ्या एक हजार ४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून दोन लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६७५ वाहनचालकांवर कारवाई करून तीन लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानंतरही वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Rules 25 rickshaws running put a sticker!