विशेष मुलांसाठी सचिनकडून मदतीचा षटकार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

समता प्रतिष्ठानने मायबोली मूक-बधिर शाळेच्या माध्यमातून 21 वर्षांत या विशेष मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि सास्कृंतिक विकासासाठी विविध प्रयत्न केले. पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खासदार सचिन तेंडुलकर यांच्या मदतीमुळे संस्थेचे प्रयत्न सफल होणार आहेत. 

- अर्जुन कोकाटे, अध्यक्ष, समता प्रतिष्ठान, येवला 

येवला : कोणी मैदानावर डिवचले तर शब्द न बोलणारा सहृदयी अन्‌ क्रिकेटचा देव अशी बिरुदावली घेऊन जगणाऱ्याचे मनदेखील किती मोठे असू शकते, याची प्रचीती येवलेकरांनी घेतलीय. तालुक्‍यातील अंगणगाव तर दूरच... येवला कुठे आहे, याचीही कल्पनाही नसताना आणि संस्था कोणती, चालवतो कोण याविषयीही माहिती नसताना केवळ दिव्यांगांच्या विकासासाठी संस्था झटतेय, हे समजताच त्याने चक्क 40 लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केलाय. केवळ संस्थेच्या अपंग पुनर्वसन प्रकल्पाचा प्रस्ताव पाहून, ज्या खासदाराने हा निधी दिला त्याचे नाव आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकर! 

समाजातील विशेषतः मूक-बधिर मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन डोळ्यापुढे ठेवून समता प्रतिष्ठान ही संस्था मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालय या विशेष शाळेच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षांपासून काम करत आहे. विद्यालयात 110 निवासी विद्यार्थी शिकताहेत. पण, फक्त 40 मुलांना शासकीय अनुदान मिळत असल्याने उर्वरित मुलांच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेला लोकाश्रयाची मदत घ्यावी लागते. या मुलांच्या भावी आयुष्याला आकार देण्यासाठी स्वयंरोजगार, व्यवसाय प्रशिक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी संस्था दानशूरांच्या मदतीतून प्रकल्प उभारत आहे. 

याच प्रयत्नांचा भाग म्हणून, भारतरत्न खासदार सचिन आपल्याही संवेदनशीलता दाखवतील, अशा विश्‍वासाने संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे व मुंबई येथील कवी अरुण म्हात्रे यांनी सचिनचे थोरले बंधू नितीन व त्यांची पत्नी मीना यांची कालिना येथील घरी भेट घेतली. त्यांनी या शाळेविषयी जाणून घेऊन संबंधित प्रस्ताव खासदार सचिन यांच्याकडे पाठविला. त्यानंतर अचानक तीन महिन्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या शाळेची इमारत व मूक-बधिर मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे पत्र प्राप्त झाले. जिल्हा नियोजन विभागाने तत्काळ पत्र पाठवून ही माहिती श्री. कोकाटे यांना कळविली. क्रिकेटच्या या देवाच्या मोठ्या मनाचा सुखद धक्का बसल्याची प्रांजल कबुली कोकाटे यांनी दिली असून, सचिन यांचे सहृदय आभार मानल्याचे पत्र पाठविले आहे.

उत्तर महाराष्ट्र

नांदगाव: शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. कारण देवाने जीवन हे मरण्यासाठी नाही तर लढण्यासाठी दिले आहे. मी मरणाच्या दाढेतून परत आलो....

05.33 PM

जळगाव : "आंधळ दळतय अन कुत्रपीठ खातंय'अशी स्थिती जळगाव महापालिकेची झाली आहे. महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅंकेचे कर्ज असल्यामुळे...

04.57 PM

नाशिक/इगतपुरी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी तालुक्‍यातील दारणा आणि भावली धरणक्षेत्रात सध्या पर्यटकांचे जथे उतरू लागले आहेत...

12.27 PM